मुंबई : सध्या लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गुगलीचा सामना करावा लागत आहे. म्हाडानं क्रिकेटर सुनील गावस्करांना वांद्रे येथं 21 हजार 348 चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला आहे. इनडोअर क्रिकेट अॅकॅडमी सुरु करण्यासाठी 33 वर्षांपूर्वी ही जमिन गावस्करांना देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्ष उलटूनही सुनील गावस्करांनी प्रशिक्षण संस्था सुरु न केल्यामुळं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून गावस्करांना टोला हाणलाय. 


वांद्र्यातील भूखंडावर क्रिकेट अकादमीऐवजी मल्टी फॅसिलिटी स्पोर्ट्स सेंटर उभं राहणार आहे. यासंपूर्ण मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी सुनील गावस्करांना ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "जर सुनिल गावस्कर नसते तर कदाचित त्यांना आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेसच्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो." 



जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, "गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर यांच्यासाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा."


काय आहे प्रकरण? 


क्रिकेट प्रशिक्षणासाठी 'सुनिल गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन'ला हा भूखंड देण्यात आला होता. मात्र अद्याप या भूखंडाचा विकास झाला नाही. आता म्हाडासोबत 30 दिवसांच्या आत भाडेकरार करावा. तसेच सुनील गावस्करांना देण्यात आलेल्या भूखंडावर इनडोअर क्रिकेट स्टेडिअमऐवजी मल्टी फॅसिलिटी स्पोर्ट्स सेंटर विथ इनडोअर आणि आऊटडोअर फॅसिलिटिज, असं नाव देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. भाडे करारनामा झाल्यावर ताबा मिळाल्यापासून एक वर्षाचा करारनामा करत बांधकाम सुरु करावं आणि तीन वर्षांच्या आत प्रयोजनासाठी वापर सुरु करावा, अशी अटही घातलेली आहे. तसेच, या प्रशिक्षण केंद्रातून जो काही नफा येईल, त्यापैकी 25 टक्के रक्कम सरकारला द्यावी लागणार आहे. 


1988 रोजी सुनील गावस्करांना इनडोअर क्रिकेट अॅकॅडमी सुरु करण्यासाठी 21 हजार 348 चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला होता. परंतु, भूखंड दिल्याला 33 वर्ष उलटल्यानंतरही अद्याप तिथे कोणतंही प्रशिक्षण केंद्र उभारलेलं नाही. परंतु अत्यंत मोक्याच्या जागी असलेला हा भूखंड कुठल्याही वापराविना पडून असल्याने काही संस्थांनी तो आपल्याला मिळावा यासाठी म्हाडाकडे मागणी केली. पण भूखंडासाठी घातलेल्या अटी शिथील करण्यात यावं म्हणून 2020 मध्ये आणि 2021 मध्ये गावस्करांनी म्हाडाला पत्र लिहिलं होतं. गावस्करांची मागणी म्हाडानं मान्य केली होती.