मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जर वाघांची देखभाल करु शकतात, तर पेंग्विनची का नाही? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पेंग्विन देखभालीचा 15 कोटींचा खर्च कोणासाठी? असा सवालही त्यांनी महापौरांना केला आहे. कोणत्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते? असा प्रश्न उपस्थित करत, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. 


नितेश राणे यांनी पत्रात म्हटलंय की, "आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीनं आपण मुंबईकरांची दिशाभूल केली आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. असो. आम्हीही समजू शकतो की, पेंग्वीनच्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. महापालिकेने प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या 2017 ते 2018 या आर्थिक वर्षात 17 हजार 57 हजार 059 होती. पण मागील दोन वर्षामध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला. आता ती संख्या 10 लाख 66 हजार 036 वर आलीय. त्यामुळे तीन वर्षात सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे."


आपल्या पत्रात पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, "मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले, असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये 2010 पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे 5 रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण 5 रूपयावरून थेट 50 रुपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदीसाठी 100 रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला 50 रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही."


"एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितलत पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतः करू शकतात तर पेंग्वीनची का नाही हा पंधरा कोटीचा पैरवीन देखभालीचा ठेका कोणासाठी?राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका पेंग्वीन च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले.", असंही नितेश राणे म्हणाले. 


"इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठी खुले केले गेले नाहीत, मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा.", असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.