Video: ते पळून जातील असं मला वाटत नाही; जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले
पवारसाहेब जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली आहे, बैठकीत जे ठरले ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षामध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलावरुन खलबतं घडत आहेत. त्यातच, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अचानक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात येणार असल्याचे समजते. 15 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर होणार आहे, त्यासाठी 4 जणांची नावे देण्यात आली आहेत. मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही कुठल्याही साध्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद द्या, जयंत पाटील (Jayant patil) यांचं मार्गदर्शन आपल्याला राहील, वरिष्ठ नेत्यांनी ठरवले आहे, आता बदल व्हायला पाहिजे त्याची सुरुवात झाली आहे, असे रोहित पवार (Rohit pawar) यांनी म्हटलं. तसेच, जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही, असेही ते स्पष्टच बोलले.
पवारसाहेब जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली आहे, बैठकीत जे ठरले ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, राजीनामा दिला म्हणून ते भाजपमध्ये जातील असं नाही, ते घाबरणारे नाहीत. आत्तापर्यंत जयंत पाटील पवार साहेबांसोबत राहिले आहेत, सत्तेसाठी ते विचार सोडून जाणार नाहीत. सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं, यासाठी ते साहेबांना, विचार सोडून जातील, लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील अस मला वाटत नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षात आमच्यात गट-तट नाहीत. नवीन कोण प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे 15 जुलै रोजी समजेल, नवीन नाव डिक्लेअर होईल. पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हेच नवीन नाव जाहीर करतील, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही साहेबांसोबत आहोत, विचारांबरोबर आहोत, पक्षाची भूमिका जिथे-कुठे मांडत आहोत. पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मी कधी टार्गेट ठेवलं नाही, एखादे छोटे पद दिले तरीही त्या पदाला न्याय द्यायचं काम मी करेन. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करत आहे, यापुढेही करत राहील, असे म्हणत प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
दबावात आणून पक्षप्रवेश
दरम्यान, भाजप संस्थां कंपनी नेत्यांना दबावात आणून पक्षप्रवेश करत आहे. काँग्रेसचे माजी आमदार जगताप हे भाजपात जाणार की नाही हे मला माहित नाही. मात्र, त्यांनी काँग्रेसमधील पदाचा राजीनामा दिला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
हेही वाचा
त्यांना टायरात घालून मारा, तो अजित पवारचा नातेवाईक का असेना; उपमुख्यमंत्री दादांचा बारामतीकरांना दम
























