Rohit Pawar on Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा (Central Government)हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे बोलले जात आहे. अशातच हा अर्थसंकल्प सादर होताच राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली, अशी बोचरी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.


भाजपने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला- रोहित पवार


देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सावत्र वागणूक देणारे भाजप सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल, ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजप सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिलाय.कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते. असेही आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी  एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.


बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का?- रोहित पवार 


 पुढे बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की,  हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल, तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या वाटाघाटी आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या