मुंबई : बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यातील लढत आता रंगत चालली आहे. दोन्ही उमेदवारांचा पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना आता आणखीन एका विषयावरून वाद पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावरुन, पवार कुटुंबातील सुप्रिया सुळेंच्या मैदानात उतरलेल्या सदस्यांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवरुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनी तर, पार्थ पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, असे म्हटले आहे.
पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्यानंतर आता आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनाही सुरक्षा देण्याची मागणी होत आहे. रोहित आणि युगेंद्र यांच्या सुरक्षिततेत वाढ करावी, अशी मागणी थेट खासदार सुप्रिया सुळेंकडून करण्यात आली आहे. पार्थ पवार अजित पवारांचे मोठे चिरंजीव असून त्यांच्याकडे सध्या कुठलेही राजकीय पद .नाही, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून ते आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. गतवर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार असलेले पार्थ यंदा प्रचारात दिसून येत आहेत. विशेष म्हणजे गतनिवडणुकीत ज्यांनी पार्थ यांचा पराभव केला, त्याच श्रीरंग बारणेंच्या उमेदवारी अर्जासाठी यंदा पार्थ यांचे वडिल अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे, राजकारण कुठल्या वळणावर गेलंय, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यातच, अजित पवारांचे दोन्ही चिरंजीव प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांना वायझेड सुरक्षा देण्यात आल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट सागर बंगल्याचा उल्लेख करत, पार्थ यांच्या वाय प्लस सुरक्षेवरुन बोचरी व उपहासात्मक टीका केली आहे.
रणगाडाही देण्यात यावा
वाय दर्जाची सुरक्षा ही कमी आहे, पार्थ मोठा नेता आहे, त्यांना झेड सेक्युरिटी द्यायला हवी होती. अजून 4-5 गाड्या वाढवायला पाहिजे होत्या. काय झालंय, कोयता गँग सामान्य लोकांना त्रास देतेय. मर्डर सामान्य लोकांचे होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे, सामान्य लोकांना सुरक्षा देण्याची काही गरज नाही. नेत्यांच्या मुलांना सेक्युरिटी दिली पाहिजे, ते देवेंद्र फडणवीस करत आहेत. सागर बंगल्याचं तेवढंच काम आहे. नेत्यांना सांभाळणं आणि सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणं. सागर बंगला खूप चांगलं काम करत आहे. माझं असं मत आहे की, पार्थला अजून दोन-तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती, रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडाही द्यावा, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावर उपहासात्मक बोचरी टीका केली.
रोहित अन् युगेंद्र यांच्यासाठीही मागणी
पार्थ पवार यांच्या सुरक्षितेत वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. पवार कुटुंबातील युगेंद्र पवार आणि रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांचा बारामती मध्ये प्रचार करत आहेत. युगेंद्र पवार यांना काही दिवसांपूर्वी घेराव घालण्यात आला होता. त्यामुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी देखील केली होती. मात्र ती अद्याप मान्य झालेली नाही. दरम्यान, बारामतीत एकूण ३८ उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. मात्र, मुख्य लढत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही उमेदवार प्रचार करताना बघायला मिळत आहेत. वाय प्लस सुरक्षा ही खरंतर अतिशय महत्वाच्या व्यक्तींना, मोठ्या राजकीय नेत्यांना किंवा ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा व्यक्तींना दिली जाते. पण, पार्थ पवार यांच्याकडे कुठलेही राजकीय पद नसताना त्यांना सुरक्षा का देण्यात आली असा प्रश्न विचारला जातोय. त्यांच्या जीवाला धोका आहे का? त्यांना खरंच सुरेक्षेची गरज आहे, म्हणून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे का असे प्रश्न दबक्या आवाजात विचारले जातायत.
संबंधित बातम्या