कोल्हापूर - राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांसाठी बड्या नेत्यांच्या प्रचारसभा व दौरे सुरू आहेत. कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजही (Shahu Maharaj) लोकसभेच्या रणांरगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या शाहू महाराजांना महायुतीच्या संजय मंडलीक यांचे आव्हान आहे. आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीराजेही मैदानात उतरले आहेत. यापूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजेंनी 6 वर्षे खासदारकी भूषवली आहे. तर, राज्यातील मराठा आरक्षणाच्या maratha-reservation मुद्द्यावरुनही ते अनेकदा आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. अनेकदा आक्रमक दिसलेले संभाजीराजे sambhaji-raje आता मात्र भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, सहा वर्षांचा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आता त्यांच्यासमवेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना निरोप देताना राजेंना गहिरवरुन आले, तर सुरक्षा रक्षकांचेही डोळे पाणावले होते.


संभाजीराजेंसोबत एस.पी.यु म्हणून दोघांनी तब्बल 7 वर्षांपेक्षा अधिकचा कार्यकाळ व्यतीत केला. त्यामुळे, साहजिकच राजेंचं त्यांच्यासमवेत कौटुबिक नातं आणि जिव्हाळा निर्माण झाला होता. मात्र, सरकारी नोकरीवर असल्याने ते कधीतरी राजेंना सोडून दुसरीकडे कर्तव्यावर जाणार हे निश्चित होतं. अखेर, ती वेळ आली, अन् तेही शाहू महाराजांच्या प्रचारासाठीचा दौरा सुरू असतानाच आली. संभाजीराजेंनी याबाबत माहिती देत भावनिक प्रसंग कथन केला आहे. 


''यश लोणकर व राजेश गर्जे हे दोघे गेल्या 7 वर्षांपासून माझ्याकडे एस.पी.यु (स्पेशल प्रोटेक्शन युनिट) म्हणून कार्यरत होते. अविरतपणे आणि अखंड कर्तव्य त्यांनी या काळात बजावले. शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त आजरा तालुक्यात दौरा सुरू असताना सोमवारी त्यांच्या बदलीचा आदेश आला. याबाबत, ''मला याची काहीच कल्पना नव्हती, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी हे दोघे आले आणि आमची बदली झाली असल्याचा आदेश मुख्यालयातून आल्याचे सांगितले. मला थोडावेळ काय बोलावे कळेना.
गेली सात वर्षे  सातत्याने सोबत राहणारे, माझी काळजी घेणारे उद्या जाणार या भावनेनेच माझे मन भरून आले. त्यांची स्थिती माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. पण, सरकारी कर्मचारी असल्याने बदली तर होणार हे स्वाभाविक आहे. आज सकाळी दोघे निरोप घेण्याकरिता आले असता, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत निरोप दिला. त्यावेळी दोघांचे पापणी आड दडलेलं अश्रु गालावर आले... अशी भावनिक आठवण संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तसेच, दोघांनी दिलेली साथ सदैव आठवणीत राहील, पण यापुढेही मी त्यांच्यासोबत कायम असेन, अशा भावनाही संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. 



संभाजीराजेंचा वडिलांसाठी प्रचार


दरम्यान, सध्या कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांसाठी महाविकास आघाडीचे नेते प्रचारदौरे करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शाहू महाराजांच्या प्रचारार्थ प्रचारगीतही लाँच करण्यात आले आहे. तर, संभाजीराजेही आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. वडिलांना निवडून आणण्यासाठी संभाजीराजे स्थानिक पातळीवर लढाई लढत आहेत. त्यामुळे, कोल्हापूरच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.