Rohit Pawar On Sanjay Shirsat : गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. तर शिंदे गटात अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, वेळोवेळी मंत्रिमंडळाची तारीख पुढे ढकलली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटात यावरून काही इच्छुक आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. मंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) प्रवक्ते केले असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. औरंगाबाद दौऱ्यावर असतांना ते बोलत होते. 


काय म्हणाले रोहित पवार? 


एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होण्यामागे दोन कारणं असू शकतात. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि मुख्यमंत्री पदासाठी अजित दादा स्पर्धक झाले आहेत. तर, दुसरे म्हणजे त्यांच्यासोबत असलेले 40 आमदारांपैकी काही आमदार नाराज आहेत. काहींना मंत्री व्हायचे होते, त्यांना प्रवक्ते करुन ठेवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आजारी आहे की, नाही माहीत नाही, पण राज्य आजारी आहे, असं रोहित पवार म्हणाले. 


काहीजण सोडून गेले. जे राहिले आहेत ते कट्टर राहिलेले आहेत. ज्यांना पवार साहेबांचे विचार मान्य आहेत, ते सर्व पवार साहेबांसोबत आहे. सर्व ठिकाणी पडझड झाली असे नाही. जे लोक कामासाठी सत्तेत राहण्याचा विचार करत होते, ते तिकडे गेले. जी माणसं लोकांमध्ये राहतात ती आमच्या सोबत आहे. तर, भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे. त्यांच्याकडे कसं दबावतंत्र आहे, हे सर्वांना माहीत आहे. 


मी राजकारणात सत्तेत जाण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला विचार जपायचा आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही कोणत्याही शक्तीला घाबरत नाही. तसेच अजित पवार अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांना कळते कोणाची भूमिका काय असेल. ज्या लोकांची भुमिका स्पष्ट आहे, त्यांना ते कसे संपर्क करतील. सोबतच, पवार आणि ठाकरेंमध्ये संवाद आहे. काँग्रेसच्या मनात शंका असेल, तर बीडमधून पवार साहेब स्पष्ट करतील, असे रोहित पवार म्हणाले. 


घाबरलेल्या भाजपकडून फोडाफोडीच काम


आम्ही लोकांमध्ये जायचा, विश्वास जिंकायचा मार्ग धरलाय. हा मार्ग सोपा नाही. भाजप आता कुठेतरी घाबरलेला आहे. त्यामुळे ते पक्ष फोडाफोडीच काम करत आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे ते कुटुंब आणि पक्ष फोडत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर बोलले, मात्र भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे. त्यांना कुठेतरी चुकीची माहिती गेली, असेही रोहित पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बळजबरीने रुग्णालयात पाठवणार; संजय शिरसाट असे का म्हणाले?