Abu Azmi Controversial Statement: अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर; औरंगजेबाच उदात्तीकरण भोवलं
Abu Azmi Controversial Statement: अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

Abu Azmi Controversial Statement: सपा आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाच उदात्तीकरण करणं भोवलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच सदस्यत्व रद्द करा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटलं होतं. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतं आझमी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य आझमींना भोवलं आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना निलंबित करण्यात आले आहे. किती काळासाठी त्यांचं निलंबन करण्यात यावं यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. औरंगजेबाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अबू आझमींना निलंबित करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेमध्ये अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली आक्रमकपणे भूमिका मांडली. याचदरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं. या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचं जाहीर करत अबू आझमींचं निलंबनावर शिक्कामोर्तब केलं आहे. अबू आझमी यांना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
सभागृहात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, अध्यक्ष महोदय मी असा प्रस्ताव मांडतो की, अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. ही त्यांची वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे. अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की, अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे.
औरंगजेब हा लुच्चा आणि लफंगा होता - सुधीर मुनंगटीवार
चंद्रकांत पाटलांनी प्रस्ताव मांडल्यानंतर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि आक्रमकपणे म्हणाले, अध्यक्ष महोदय, अबू आझमींचं निलंबन हे फक्त हे अधिवेशन संपेपर्यंतच का? छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव किंवा देवापेक्षा जास्त मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अबू आझमींनी केला आहे. औरंगजेब हा लुच्चा आणि लफंगा होता. औरंगजेबाच्या बापानेही काय म्हटलं आहे? शहाजहाँने सांगितलं होतं की, उन्हाळा वाढला आहे. माझं प्यायचं पाणी वाढवा, तेव्हा लुच्चा लफंगा औरंग्या काय म्हणतो? जिंदा रहना है तो रहो नही तो मर जाओ. जो स्वतःच्या बापाला असं म्हणतो आहे. त्याच्याबाबत अबू आझमी असं कसं काय बोलतो? त्याची भलामण अबू आझमी कशी काय करतात? मी चंद्रकांत पाटील यांना सांगू इच्छितो की, प्रस्तावात बदल करा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अपमान यासाठी कुठलंही आयुध लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान झाल्यास कुठल्याही आयुधाची मर्यादा बाळगू नये असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.























