Nagpur News नागपूरसरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या आमच्या विविध मागण्यांबद्दल 23 ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घेण्यासंदर्भात भूमिका घेतली नाही, तर आम्ही 23 ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात प्रवेश करू आणि शेतकरी आत्महत्या कशी करतो याचे प्रात्यक्षिक सरकारला  दाखवणार, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.


वर्षा बंगल्यावर आम्हाला शेतकरी आत्महत्येचा प्रात्यक्षिक दाखवायचा आहे. 23 ऑगस्ट रोजी आम्ही त्यासाठी वर्षा बंगल्यात घुसणार. कारण तो बंगला आमच्या करदात्यांच्या कष्टाने उभा राहिला आहे, तो कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवू त्यात कोणाचा बरं वाईट झालं तर ती सर्व जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची राहणार असेही तुपकर म्हणाले.


तर शेतकरी आरपारची लढाई सुरू करेल- रविकांत तुपकर


23 तारखेच्या आमच्या आंदोलनानंतर ही सरकार जागं झालेला दिसलं नाही, तर शेतकरी आरपारची लढाई सुरू करेल. आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करू, असेही तुपकर म्हणाले. वर्षा बंगल्याकडे आम्ही आपापल्या ठिकाणावरून कूच करू. एका ठिकाणावरून आम्ही निघणार नाही. त्यासाठी हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निश्चित जातील, असा दावा ही त्यांनी केलाय. 


शेतकाऱ्यांच्या प्रश्नांवरुन शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आक्रमक 


दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. नागपूरातील संविधान चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे बुरशी लागलेल्या मोसंबी आणि संत्र्याची फळे घेऊन जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांचं आंदोलन केलंय. सततच्या पावसामुळे बुरशीची लागण होऊन नागपूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात संत्रा आणि मोसंबीची गळती होत आहे. मात्र, कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे न झाल्यामुळे पवार गट आज आक्रमक होऊन आंदोलन करत आहे.


नागपूर जिल्ह्यात 35 हजार हेक्टरवर संत्रा आणि 17 हजार हेक्टरवर मोसंबी बाग आहेत. आंबिया बहाराच्या संत्रा-मोसंबीस 50 टक्क्यांवर नुकसान झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकाऱ्यांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मागणी केली आहे.


हे ही वाचा