Nagpur News नागपूर : आपण हे लक्षात घ्यायला हवं, मी बाबासाहेबांचा नातू आहे. त्या हिशोबाने मी नेताच आहे. मला कुणाच्या संमतीची आवश्यकता नाही. इतरांना नेते होण्यासाठी संमती लागते. त्यानंतर ते नेते होतात.मात्र मी पूर्वापार नेताच असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. नेहमीच चर्चेत राहणाऱ्या रिपब्लिकन गटांच्या (Republican Party of India) ऐक्याबद्दल प्रकाश आंबेडकरांना प्रश्न केला असता त्यांनी हे मोठे विधान केलंय. मुंबईत रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळ्या गटाच्या ऐक्याचे प्रयत्न झाले. रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळे गट तुम्हाला नेते करण्यासाठी ही तयार आहेत. त्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हे रोखठोक उत्तर दिले आहे. नागपुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय.
तर त्यांनी होम हवन करून मोकळे व्हावं
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी केली. तेव्हा त्यांचं नातू पक्षाच्या ऐक्याबद्दल असं म्हणत असेल तर ही शोकांतिका नाही का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुणाला याबद्दल काही वाटत असेल, तर त्यांनी होम हवन करून मोकळे व्हावं. मुळात मला एक जातीय पार्टी चालवायची नाही. सर्व सम दुखींना एकत्रित घेऊन आम्ही चाललो आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटातील नेत्यांना माझा निमंत्रण आहे की त्यांनी आमच्या आघाडीत सहभागी व्हावं, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
आम्ही सऱ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत
जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केलीय. त्यानंतर वंचितने आरक्षण बचाओ यात्रा राज्यातील 22 जिल्ह्यात काढली. शांततेसाठी आम्ही प्रयत्न केलेत. यात अनेक आदिवासी संघटनांसोबत आमचे बोलणे सुरू होते. आजा ही बैठक झाली. त्यात अशी चर्चा झाली की कोणत्याही अटी शर्ती न घालता आपण एकत्रित आलो पाहिजे आणि आपले प्रतिनिधी विधानसभेत गेले पाहिजे. देशातील 80 टक्के खनिज देशातील आदिवासी भागात आहे आणि त्याचा वापर प्रामुख्याने बिगर आदिवासी भागातील लोकं करत आहे. त्यामुळे आम्ही सऱ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं
भाजप समाजात एका जातीच्या विरोधात द्वेष पसरवते- प्रकाश आंबेडकर
काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना आज बदलापूर शहरातून समोर आली आहे. यात चार वर्षांच्या चिमूरडींवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना दिसून आले आहे. बदलापूरमध्ये या घटनेला हिंसक वळण लागले आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्ही हिंसाचार पसरविणार असाल तर समाज हिसंकच होईल. जनतेने हे लक्षात ठेवावे की भाजप समाजात एका जातीच्या विरोधात द्वेष पसरवीत असते आणि त्याचे परिणाम आता संपूर्ण समाजात दिसत आहे. समाजातून जिव्हाळा, आपुलकी ही नष्ट झाली आहे. त्यामुळे समोर लहान मूल आहे की कोण हे ही आरोपी पाहत नाही.
हे ही वाचा