विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोकणात ठाकरे गट लागला कामाला, उदय सामंतांविरोधात उमेदवाराची चाचपणी सुरु
Ratnagiri News : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोकणात ठाकरे गट लागला कामालाउद्योगमंत्री उदय सामंतांविरोधात उमेदवाराची चाचपणी सुरुराजन साळवी यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाबाबत विचारणा - सूत्र
Ratnagiri News : बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोकणात (Konkan) शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Thackeray Group) जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात उमेदवारासाठी आतापासून शोध सुरु झाला आहे. रत्नागिरी-संगमेश्वर या उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये राजापूर-लांजा या ठिकाणचे विद्यमान आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना विचारणा करण्यात आली आहे. पण, साळवी मात्र अद्याप तरी रत्नागिरीमधून लढण्यास राजी होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राजन साळवी हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. शिवसेनेच्या बांधणीसाठी राजन साळवी यांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांची असलेली फौज आणि दांडगा जनसंपर्क या राजन साळवी यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे राजन साळवी हे उदय सामंत यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करु शकतात, असं मानणारा देखील एक मोठा वर्ग आहे. त्याचमुळे सध्या विविध चर्चा रंगताना दिसून येत आहेत. साऱ्या शक्यतांचा, राजकीय गणिताचा विचार केल्यास शिवाय राजन साळवी यांची रत्नागिरी येथील ताकद पाहिल्यास साळवी सामंतांसमोर तगडा आव्हान उभं करु शकतात. त्यामुळे सध्या ठाकरे गट उदय सामंत यांच्यासमोर साळवी यांचं आव्हान उभे करण्याच्या प्रयत्न असल्याची चर्चा सुरु झालेली आहे.
भास्कर जाधव रत्नागिरीमधून लढण्यास उत्सुक?
दरम्यान, पक्षाने सांगितल्यास रत्नागिरीमधून देखील लढेन, अशी प्रतिक्रिया गुहागरचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिली होती. शिवाय, त्यांनी एबीपी माझाकडे बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला मुलगा विक्रांत जाधव याला गुहागरमधून उमेदवारी मिळू शकते असे सुतोवाच देखील केले होते. त्यामुळे आता विविध मतदारसंघ, समीकरणं आणि उमेदवार याबाबत सध्या कोकणातील राजकीय वर्तुळात आखाडे बांधले जात आहेत. मुख्य बाब म्हणजे भाजपने देखील कोकणात लक्ष केंद्रीत केल्याने राजकीय सारीपटावरच्या चाली महत्त्वाच्या असणार आहेत.
बंडखोरीनंतर कोकणाती बहुतांश आमदार शिंदे गटात
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे तब्बल 40 आमदार फुटले. यात कोकणातील आमदारांची संख्या मोठी होती. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जोता. परंतु बहुतांश आमदार शिंदे गटात गेले. त्यात उदय सामंत यांचाही समावेश आहे. बंड झालं त्यावेळी राजन साळवी देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत.