परभणी : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांना आवाहन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करताना दिसतोय. अशाच पद्धतीचा एक हटके अंदाज आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पाहायला मिळाला. डोळ्यावर गॉगल, डोक्यावर गमजा आणि हातात बैलगाडीचा कासरा घेत रावसाहेब दानवेंनी आज बैलगाडीतून प्रचार केला. त्यावेळी त्यांच्या मागे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि आमदार मेघना बोर्डीकर या देखील होत्या.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज परभणीच्या सेलू तालुक्यात होते. यावेळी त्यांनी चारठाणा येथे बैलगाडीतून फेरी मारली. त्या गाडीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर तसेच आमदार मेघना बोर्डीकर ही बसल्या होत्या. हातात कासरा धरून रावसाहेब दानवे हे बैलगाडी चालवत होते, तर त्यांच्या पाठीमागे महादेव जानकर उभे होते. आजूबाजूने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते घोषणा देत होते. शिट्टी वाजवत सर्वांनी महादेव जानकर यांना मतदान करण्याच आवाहन ही यावेळी करण्यात आला आहे.
महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे परभणी लोकसभेच्या रिंगणात असून ते शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव हे उमेदवार आहेत.
परभणीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष
परभणी हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी ठाकरे गटाकडून खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याल्या आलेली ही जागा महायुतीत आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांना देण्यात आली आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाचं मतदान सुनेत्रा पवार यांना मिळावं यासाठी महादेव जानकरांची मदत घेण्यात आली असून त्यांना परभणीतून उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. या आधी महादेव जानकर हे शरद पवारांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या पक्षाकडून माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही झाली होती. ऐनवेळी देवेंद्र फडणवीसांनी महादेव जानकरांना आपल्या बाजूने वळवलं.
मराठा विरूद्ध ओबीसी असं मतविभाजन होण्याची शक्यता
परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा विरूद्ध ओबीसी असं मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात परभणीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या असून त्याचा परिणाम यंदाच्या लोकसभेत दिसण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: