केंद्रात आपलं सरकार आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार: रावसाहेब दानवे
Raosaheb Danve : लोकसभेची आणि विधानसभेची वेगवेगळी न करता विधानसभेची आताच तयारी करा असे निर्देश जालन्यातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
जालना : जर आपलं सरकार आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेचीही पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार आहे, त्यामुळे लोकसभेतच विधानसभेची तयारी करा असं म्हणत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसैनिकांना आवाहन केलंय.आता अर्जुन खोतकर जसे माझ्यासोबत आहेत तसेच आपण विधानसभेला त्यांच्यासोबत राहणार असल्याचं वचनही रावसाहेब दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिलं. जालन्यामध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे.
जालना येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, लोकसभेनंतर आता विधानसभेला जास्त काळ उरला नाही. त्यामुळे आता केंद्रात भाजपचं सरकार आलं तर लगेच गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी भाजून घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर नाराज असल्याची चर्चा होती. रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरण्याची चिन्हं होती. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांची भेट घेऊन चर्चा केली.
जालन्यात रंगतदार लढत
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात लढत होणार आहे. मराठा आरक्षणासाठी स्वत:ची चारचाकी जाळणारे आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी फोडण्याचा आरोप असलेले मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी मंगेश साबळेंना जाब विचारला होता. निवडणुकीत मनोज जरांगेंच्या नावाचा वापर करायचा नाही, असं मनोज जरांगेंच्या समर्थकांनी सुनावलं होतं.
मराठा आंदोलनाचा प्रभाव
मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यातील जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. राज्य सरकारने दिलेले 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मनोज जरांगे यांनी अमान्य केलं असून सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे यांनी महाविकास आगाडी किंवा महायुती या दोघांनाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. मराठ्यांनी यावेळी कुणाला जिंकवण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि त्यानंतर आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
ही बातमी वाचा: