जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस..' रामगिरी महाराजांचे आव्हाडांच्या टीकेला प्रत्यूत्तर, राष्ट्रगिताच्या वक्तव्यावरून म्हणाले
'जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस आहे. इतिहास शिकवण्याची गरज नाही. इतिहास आहेच तो फक्त वाचण्याची गरज आहे. परंतु...
Ramgiri Maharaj on Jitendra Awhad: आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता पुन्हा राजकीय वातावरण तापू लागलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महंत रामगिरी महाराजांनी जन-गण-मन नाही तर वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत हवे होते अशा आशयाचे वक्तव्य केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजाला जोड्याने मारला पाहिजे अशी टोकदार टीका केल्यानंतर यावर रामगिरी महाराजांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलंय. 'जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस आहे. इतिहास शिकवण्याची गरज नाही. इतिहास आहेच तो फक्त वाचण्याची गरज आहे. परंतु त्यांना इतिहास समजूनच घ्यायचा नाही हे त्यांचे दुर्दैव आहे', असं महंत रामगिरी महाराज म्हणालेत. अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमने झाली. त्याबद्दल समाधान व्यक्त करत वंदे मातरम हेच राष्ट्रगीत असावे असा पुनरुच्चार रामगिरी महाराजांनी केलाय.
रामगिरी महाराज काय म्हणाले..
जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी आत्तापर्यंत पाहिला नाही. इतिहास आहेच. तो वाचण्याची गरज आहे. इतिहास आज लिहिलेला नाही. तो शिकण्याची आवश्यकता नाही. जो आहे तो इतिहास त्यांनी वाचण्याची गरज आहे. त्यांना तो वाचायचं नाही हेच दुर्दैव आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे बोलताना रामगिरी महाराज म्हणाले की, 1911 मध्ये कोलकात्यात टागोर यांनी हे गाणे ब्रिटिश राजवटीच्या काळात गायकले होते. "टागोर यांनी हे गाणे जॉर्ज पाचव्या, त्या वेळच्या ब्रिटिश सम्राटासमोर सादर केले, ज्याने भारतीयांना अनेक जखमा दिल्या आहेत. हे गाणे देशासाठी नव्हते," असा दावा त्यांनी केला होता. यावर ते अजून ठाम असून त्यांच्यावर कडवी टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर त्यांनी प्रत्यूत्तर दिलंय.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
जनगणमन हे राष्ट्रगीत नको म्हणत असलेल्या रामगिरी महाराजांवर जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून टीका केली. आता त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली आहे. त्याला म्हणाव तुम्ही मागणी करा बाबा..आता अति व्हायला लागलंय रामगिरीचं. आता जनगणमन यावर देखील त्यांचा आक्षेप आहे. देशाने आता इतिहास हा रामगिरी कडून शिकायचा आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. यावरून आता रामगिरी महाराजांनी जितेंद्र आव्हाड यांना अहिल्यानगरच्या कार्यक्रमात प्रत्युत्तर दिलंय.