Raj Thackeray Uddhav Thackeray: सगळीकडे टाळ्या, शिट्ट्या, घोषणा; राज ठाकरेंचं एक वाक्य अन् सर्व चिडीचूप, वरळी डोममध्ये काय घडलं?
Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे सुरुवातीपासून महाराष्ट्रभर उत्साहाचे वातावरण होते. सगळीकडे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंद साजरा करत होते.

Raj Thackeray Uddhav Thackeray मुंबई: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. स्टेजवर दाखल होताच राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकमेकांना मिठी मारली. ठाकरे बंधूंनी यावेळी त्रिभाषा सूत्रावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे सुरुवातीपासून महाराष्ट्रभर उत्साहाचे वातावरण होते. सगळीकडे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंद साजरा करत होते. वरळीत देखील ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते थिरकताना दिसले. तसेच ठाकरे बंधूंच्या स्टेजवरील एन्ट्रीनंतर वरळीच्या डोममध्ये सतत घोषणा, टाळ्या, शिट्ट्या सुरु होत्या. पहिले राज ठाकरेंनी भाषण केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण झालं. राज ठाकरेंनी अनेक मुद्दे मांडले. तसेच आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत भाषण गाजवलं. याचदरम्यान, राज ठाकरेंचं भाषण सुरु असताना उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद दिला जात होता. आज आपण मराठी म्हणून एकत्र आलात, असं राज ठाकरे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या, घोषणा दिल्या. यावर टाळ्या वाजवू नका, मी पुढे काय म्हणतो, नीट ऐका, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या वाक्यानंतर संपूर्ण वरळी डोम चिडीचूप पाहायला मिळालं. यानंतर हे लोक पुन्हा जातीचं कार्ड खेळणार, मराठी म्हणून कधी एकत्र येऊ देणार नाही. जाती-पातीचं राजकारण करतील, असं राज ठाकरेंनी सांगितले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आज सगळे तुम्ही मराठी म्हणून एकत्र आला आहेत. त्यामुळे आता पुढे जातीपातीचं राजकारण सुरु होईल. आता सुरू केलंय यांनी मीरा भाईंदरला व्यापाराच्या कानफाडात मारली. व्यापाऱ्याला मारलं म्हणतात, पण अजून तर काहीच केलेलं नाही. विनाकारण मारामारी करत नाहीत. मात्र जास्त उठबस केली तर कानाखाली आवाज काढला जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तसेच ज्यावेळी असं कराल तेव्हा व्हिडीओ करु नका, त्यांना सांगू द्या, मला मारलं म्हणून, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला. नयन शाह नावाचा माझा मित्र आहे. मी त्याला गुजराठी म्हणतो. अतिशय उत्तम मराठी बोलतो. शिवाजी पार्कत फिरताना पु.ल. देशपांडे ऐकतो, असं राज ठाकरे म्हणाले.
एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते- राज ठाकरे
आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे आणि आमची रस्त्यावर सत्ता आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे? आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त 200 वर्ष पूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. यांना काय मज्जाक वाटली का सक्ती करायला?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. मला बाळासाहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का?, असा सवाल उपस्थित करत मराठीसाठीची एकजूट कायम राहणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

























