ठाणे : माझे आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचै मैत्रीपूर्ण संबंध होते. बाळासाहेबंसोबत (Balasaheb Thackeray) मी खूप वेळा ठाण्यात आलो, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याकाळात आचारसंहिता नव्हती, तेव्हा सभेसाठी मोठे व्यासपीठ नव्हते, छोटं व्यासपीठ आणि गाद्या असायच्या. तेव्हाचं ठाणे म्हणजे तलावांचं शहर. टुमदार शहर होतं, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी कळव्यातील सभेत हे वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरेंकडून धर्मवीरांच्या आठवणींना उजाळा
श्रीकांत शिंदेंनी सांगितलं तसं फेव्हिकॉलचा जोड, पण पुढच्या वेळेला आतून लावा पण, नाही तर आमची बाजू बाहेरच. असं म्हणत त्यांनी खोचक टोला दिला. आनंद मठात गेलो, तेव्हा जुने दिवस आठवायला लागले. आनंद दिघे आणि माझे मैत्रिपूर्ण संबंध होते. तेव्हा त्यांना मी सांगायचो आश्रम स्वच्छ ठेवा. सर्वत्र अस्वच्छता असायची आणि ते त्यातच झोपायचे, आज लक्षात नाही आलं की, त्याच वास्तूत आलोय. तेव्हा आचारसंहिता वगैरे काही नव्हतं. रात्री 12-1 पर्यंत भाषणं चालायची. ठाणे टुमदार शहर होतं. तलाव बुजवलेत आणि टँकर सुरु झालेत. 30-35 वर्षांआधीचं असेल ते ठाणे, असं राज ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
आता काँक्रीट जंगलं उभी राहात आहेत, गेले अनेक वर्ष सांगतोय वेगवेगळ्या राज्यातून लोकं महाराष्ट्रात येतायत. बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही. दोन्ही खासदारांनी कितीही फंड आणलेत, तर काही होऊ शकेल, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. लोकसंख्येवर पालिका, महापालिका ठरते. पुण्यात किती पालिका दोन, लोकसंख्येनुसार एक महापालिका आहे. ठाणे एकमेव जिल्हा आहे ज्यात 7-8 महापालिका आहेत. इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही. मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, तिकडे हेच मांडा, आमच्यावरचा बोझा आवरा आता. कितीही मेट्रो आणि विकास केला तरी, काहीही होणार नाही, या मुद्द्यांकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे.
पहिली निवडणूक बघतोय ज्यात विषयच नाही
निवडणुका विकास चांगला झाला, पाहिजे यासाठी लढवली जाते. महाराष्ट्रात अट फक्त एक मराठी बोलता आलं पाहिजे. पुण्यात मी सांगितलं, पहिली निवडणूक बघतोय ज्यात विषयच नाही. उमजायला लागलं राजकारण, तेव्हा इंदिरा गांधीची लाट होती. 1997 ला बाबरीवर निवडणूक झाली, 1998 ला कांद्यावर निवडणूक झाली. आता कोणताही विषय नाही विषय नाही, त्यामुळे एकमेकांच्या आईबहीणींचा उद्धार करतायत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
पाहा व्हिडीओ : राज ठाकरेंचं ठाण्याच्या सभेतील अन-कट भाषण
महत्त्वाच्या इतर बातम्या :