मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना 1999 पासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत होतं, अशी टीका केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कच्चे मडके असल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला. आता संजय राऊत यांच्या टीकेला भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांना 1999 पासूनच मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत होती. पण त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत येत नसल्याने त्यांनी अपक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष द्यायला सुरुवात केली, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
फडणवीस राजकारणातले कच्चे मडके - संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत म्हणाले की, आम्हाला स्वप्न पडत नाहीत. आमची स्वप्न ही राष्ट्राच्या हिताची असतात. तुम्हाला जो स्वप्नातला आजार झाला होता, तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस काय आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहितीय - चित्रा वाघ
संजय राऊत यांच्या टीकेवर चित्रा वाघ यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. या व्हिडिओत चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत. देवेंद्र फडणवीस काय आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिट मटेरियल आहेत. तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात.
देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही - चित्रा वाघ
त्यामुळे ४ जूनला तुम्ही जनतेकडून सणसणीतपणे लाथाडले जाणार आहात. कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठे तुम्हा नकलींचा कमअस्सल खोटा शिक्का? देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही. जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे ते निष्णात डॅाक्टर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे सल्ले उद्धवजींसाठी जपून ठेवा. आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीची भाषा वापराल तर त्याचं भाषेत ठोक उत्तर तुम्हाला देऊ हे लक्षात ठेवा, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.
आणखी वाचा