Eknath Khadse जळगाव : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी मोठी घोषणा ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत केली आहे. आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लढवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा मी निर्णय घेतला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. खासदारकी माझ्या परिवारात आहे. त्यामुळे मी लोकसभाही लढवणार नाही. मात्र, मी मरेपर्यंत राजकीय संन्यास घेणार नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. ते आज जळगाव येथे बोलत होते.  


नरेंद्र मोदींना कुणाचीच गरज नाही- एकनाथ खडसे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना थेट शरद पवार यांना भाजपमध्ये शमील होण्याचे आवाहन केले होते. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान का केलं असावं त्याचे अर्थ वेगवेगळे लागू शकतात. पण नरेंद्र मोदी यांना कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं चांगलं बहुमत त्यांना मिळेल. राजकारणात लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणे, मोठे पक्ष बरखास्त होणे, अशी प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वीही घडली आहे. निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा हा एक भाग असतो. त्या माध्यमातून शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं, असेही एकनाथ खडसे म्हणाले.


नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे, शरद पवारांची गरज पडू शकते, माझ्या या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. नरेंद्र मोदी यांची आजची स्थिती 400 पारची आहे. नरेंद्र मोदी यांची आजची स्थिती पाहता नरेंद्र मोदींना कुणाची गरज भासेल असं वाटत नसल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.


 निवडणूक संपताच तातडीने पक्षप्रवेश


माझ्या भाजप पक्षप्रवेशाला आता कुणाचाही विरोध राहिलेला नाही. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर तातडीने पक्षप्रवेश होणार, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन (Girish Mahajan), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या तिघांचा आता विरोध नाही. मुळात विरोध नव्हताच, त्यांचे नाराजीचे सूर होते. ती नाराजी आता दूर झाली आहे. असे बेधडक उत्तर देत भाजप पक्ष प्रवेशावरील नाराजीच्या चर्चेला  एकनाथ खडसे यांनीच पूर्णविराम दिलाय. 


रोहिणी खडसे यांचे स्वतंत्र विचार आहेत


शरद पवार गट सोडताना एकनाथ खडसेंनी मला मुलगी म्हणून सोबत येण्याबद्दल विचारणा केली, मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिला, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केले. यावर एकनाथ खडसे म्हणाले की, रोहिणी खडसे यांना भाजप मध्ये येण्याचे मी आवाहन केलं होतं. मात्र रोहिणी खडसेंना ते मान्य नाही. रोहिणी खडसे या विवाहित आहेत. त्या वेगळ्या राहतात. त्यामुळे रोहिणी खडसे यांचे विचार स्वतंत्र आहेत . त्यामुळे रोहिणी खडसे यांनी घेतलेल्या निर्णयाला मी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे रोहिणी खडसे राष्ट्रवादीचं काम करतील. तर मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे काम करणार, असे त्यांनी म्हटले. 


इतर महत्वाच्या बातम्या