Raj Thackeray मोठी बातमी : इकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, तिकडे मनसेचा एकमेव नगरसेवकही फुटला!
Sanjay Turde: मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकला आहे.

Sanjay Turde मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असताना मुंबईत मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे (Sanjay Turde) यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकला आहे. संजय तुर्डे मुंबईतील कालिना विभागातून निवडून आले होते.
संजय तुर्डे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय तुर्डे यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळाले आहे. संजय तुर्डे यांच्यासोबत कलिना परिसरातील मनसेचे पदाधिकारी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी खेळल्याचं सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कोण आहेत संजय तुर्डे?
गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे एकूण सात उमेदवार विजयी होऊन मुंबई महानगरपालिकेत दाखल झाले होते. त्यापैकी माजी नगरसेवक दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मारे या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र संजय तुर्डे यांनी मनसेत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संजय तुर्डे हे मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक होते.
राज ठाकरेंनी बोलावली बैठक-
मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडले. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता थेट बातमीच देऊ- उद्धव ठाकरे
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा रंगलीय. अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, सूचक वक्तव्यही येतायत. पण या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंनी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावं असं म्हंटलं आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं वक्तव्य केलंय. जे जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत, आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.























