Rohit Pawar: राज ठाकरे-फडणवीसांची गुप्त भेट! शिवसेना-मनसे युतीत 'ब्रेक'? रोहित पवार म्हणाले, बार्गेनिंग पॉवर वाढवून फायदा घेतला का?
Rohit Pawar: राज ठाकरे सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले, आणि अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी पोहोचले.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय एकत्रीकरणाच्या चर्चा रंगत असतानाच, आज (गुरूवार 12 जून) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या भेटीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - मनसे युतीला ब्रेक लागणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज ठाकरे सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले, आणि अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी पोहोचले. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने, यामागे राजकीय रणनीती असल्याचं संकेत मिळू लागले आहेत. यादरम्यान राजकीय वर्तुळात दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच या भेटीने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असतांनाच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर वाटाघाटी करण्यासाठी ती वातावरण निर्मिती झाली होती का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या भेटीमुळे मनसे आणि भाजपमध्ये नव्याने जवळीक वाढणार का, यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन होऊन शिवसेना (उबाठा) - मनसे युतीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ही भेट त्या चर्चांवर विरजण घालणारी ठरू शकते.
ठाकरे बंधू एकत्र येणार असे सामान्य लोकांमध्ये वातावरण निर्मिती झाली असताना राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर मनसेने वाटाघाटी करण्यासाठी ते ती वातावरण निर्मिती झाली होती का? असा सवाल निर्माण होईल व राज ठाकरे यांचे नाव खराब होईल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
फडणवीस - ठाकरे भेटीचा राजकीय अर्थ काय?
या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळे भाजपने पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. शिवसेना-मनसे युतीचं गणित बिघडवण्यासाठी हा राजकीय डाव होता का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान,देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे यांनी या भेटीबाबत अधिकृत वक्तव्य दिलं नसून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या संभाव्य युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होते. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती घडल्यास मोठे राजकीय समीकरण बदलू शकते, अशी चर्चा होती. मात्र, आता या सर्व चर्चांना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त भेटीनंतर विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात पुन्हा सुधारताना दिसले. दोघे एकत्र येऊन भाजप विरोधात ताकद उभी करणार, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता.
मात्र, या संभाव्य युतीला ‘ब्रेक’ लागण्याचं मुख्य कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘राजकीय टाइमिंग’ असल्याचं बोललं जातं. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे फडणवीस हे खेळाचे जाणकार रणनीतीकार मानले जातात. त्यांनीच राज ठाकरे यांना योग्य वेळ साधून भेट घेऊन युतीपासून परावृत्त केलं असावं, असा कयास बांधला जात आहे. ही भेट मुंबईत वांद्रे येथील हॉटेलमध्ये झाली असून, ती पूर्वनियोजित नसल्याची चर्चा आहे.
सध्या मनसे भाजपच्या जवळ जातेय?
या भेटीनंतर मनसे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जातेय का, हा प्रश्न समोर आला आहे. जर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असेल, तर ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.मएकूणच, महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वीचे राजकारण चांगलेच तापले आहे, आणि या भेटींनी नवीन समीकरणांनाची उजळणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

























