Uddhav Thackeray and Raj Thackeray: वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना 'सामना'च्या अग्रलेखातून घातली पुन्हा साद, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
Raj Thackeray & Uddhav Thackeray yuti speculations: मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

Shivsena Thackeray Camp & MNS Alliance: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. परंतु, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची गुप्तपणे भेट घेतली होती. ही बातमी बाहेर आल्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेनेच्या वर्धापनदिनी दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे साद घालण्यात आली आहे. ठाकरे बंधूंची युती होऊ नये म्हणून शिंदे गट आणि भाजप देव पाण्यात बुडवून बसले आहेत, अशी टिप्पणी 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
शिवसेना व नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा वापरून तोडल्यावरही या त्रस्त समंधांचा आत्मा शांत झालेला नाही. त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीतून 'मराठी' माणूस कायमचा हद्दपार करायचाच आहे. हे आक्रमण थांबवायचे असेल तर मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल. त्यादृष्टीने एक ज्वलंत लोकभावना सध्या महाराष्ट्रात चर्चेला आली आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे व उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेइमानांचे धाबे दणाणले. ही अशा पद्धतीने 'मराठी एकजूट' झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे लागेल या भीतीने अनेकांची गाळण उडाल्याचे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
Raj Thackeray meets Devendra Fadnavis: राज ठाकरे-फडणवीस भेटीवर 'सामना'तून भाष्य
'एसंशि' गटापासून भाजपच्या व्यापार मंडळापर्यंत प्रत्येक जण देव पाण्यात घालून बसला आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा फोडायची असेल तर संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू झाला आणि तसे झालेच. मुख्यमंत्री देवेंदर फडणवीस व राज ठाकरे यांची भेट एका पंचतारांकित हॉटेलात झाली (अहो, झाली तर झाली!), पण लगेच भाजपमध्ये आणि 'एसंशि' गटात उत्सव सुरू झाला, "मराठी जनांची एकजूट मोडली हो।" म्हणून हे लोक पेढे वाटू लागले. भाजपचे मुखपत्र असलेल्या 'तरुण भारत'चा मथळाच सांगतोय की, 'आनंदी आनंद गडे, चर्चा थंडावली, राज-उद्धव युतीला विराम, फडणवीस-राज भेटीमुळे युतीच्या चर्चाना अचानक ब्रेक लागला आहे.' विषाला उकळी फुटते ती अशी. भाजप आणि फडणवीसांचा कावा यात स्पष्ट दिसतो. लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला 'ब्रेक' लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे. शिवसेना शतायुषी होईल. त्यापुढे जाईल. जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून. महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे, पण एक मात्र नक्की, असा निर्धार 'सामना'च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.
आणखी वाचा
मुंबईत मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टच सांगितलं























