Raigad Loksabha: ज्यांनी मनसे संपवायची होती, त्यांनाच पाठिंबा कसा द्यायचा; मनसेच्या वैभव खेडेकरांचा तटकरेंना विरोध, राज ठाकरेंनी तातडीने शिवतीर्थवर बोलावलं
Raigad Lok Sabha: राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मनसेच्या वैभव खेडेकर यांनी विरोध केला आहे. मुंबईत मनसेची महत्त्वाची बैठक
रायगड: राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही अजितदादा गटाच्या सुनील तटकरे यांच्यासमोरही अशीच समस्या उभी राहिली आहे. मनसेचे स्थानिक नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ज्यांनी रायगड जिल्ह्यात मनसे (MNS) पक्ष संपवण्याचे काम केले त्यांना पाठिंबा कसा द्यायचा, असा सवाल मनसैनिक विचारत आहेत, असे खेडेकर यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वैभव खेडेकर यांना तातडीने मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी बोलवून घेतले आहे. याठिकाणी राज ठाकरे (Raj Thackeray) हे वैभव खेडेकरांना काय सांगणार,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वैभव खेडेकर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, गुरुवारी सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांनी उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगडमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ज्यांनी मनसे संपवण्याचं काम केलं त्यांचं काम करायचं का? कोकणात गेली 20 वर्षे मनसेची वाटचाल संघर्षमय राहिली आहे. अनेक लोकांनी मनसेला संपवण्याचे प्रयत्न केले. हेच सुनील तटकरे रायगड लोकसभेचे उमेदवार आहेत. सुनील तटकरे यांनी गेल्या पाच वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामे केली नाहीत. आम्ही ही सर्व परिस्थिती राज ठाकरे यांच्यासमोर मांडू. ते देतील तो आदेश आम्हाला मान्य असेल, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले.
वैभव खेडेकर आणि सुनील तटकरे यांच्यात नेमका वाद काय?
वैभव खेडेकर हे खेड नगरपरिषदेचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर डिझेल घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यावेळी सुनील तटकरेंच्या खेळीमुळे वैभव खेडेकर अपात्र ठरले होते. त्यानंतर रस्त्याच्या आंदोलनावेळी वैभव खेडेकर यांना अटक झाली होती. तेव्हाही सुनील तटकरे यांनी त्यांना मदत केली नव्हती. तसेच सुनील तटकरे यांनी मनसेविरोधात रामदास कदम यांना फूस लावली आणि अनेक ग्रामपंचायतींमध्ये असणारे मनसेचे सदस्य फोडले, असा वैभव खेडेकर यांचा आरोप आहे. खासदार झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी मनसेला सापत्न वागणूक दिली. मनसेच्या एकाही प्रस्तावाला मान्यता दिली नाही, अशी तक्रारही खेडेकर यांनी केली.
सुनील तटकरे काय म्हणाले?
वैभव खेडेकर यांच्या आरोपांविषयी सुनील तटकरे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर तटकरे यांनी म्हटले की, वैभव खेडेकर यांना मी काय मदत केली, हे खेडची जनता जाणून आहे. मी वैभव खेडेकर यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलेन. त्यांचे गैरसमज दूर केले जातील, असे तटकरे यांनी सांगितले.
आणखी वाचा
रायगडावर सुनील तटकरे नाराजीची 'तटबंदी' भेदून किल्ला राखणार की अनंत गीते मशाल पेटवणार?