Rahul Gandhi नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे (Nashik) राजकीय महत्व वाढले आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते नाशिकला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) उद्घाटन करण्यात आले. तसेच मोदींनी काळाराम मंदिराचे (Kalaram Mandir) दर्शन घेतले. त्यांचा जंगी रोड शो देखील नाशकात पार पडला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील नाशिक दौरे झाले. 


22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला न जाता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकला हजेरी लावली. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. तसेच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही नाशिकमध्ये पार पडली. यावेळी ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग नाशिकमध्ये फुंकले. आता यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. 


राहुल गांधी काळाराम मंदिराला देणार भेट


'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) अंतिम टप्प्यात नाशिकमधून जाणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. ते शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. राहुल गांधीही पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणार असून, रामतीर्थ येथे आरती करणार आहेत. कालिका मंदिर भेटीचाही समावेश 'भारत जोडो न्याय' यात्रेत होण्याची शक्यता आहे.


स्थानिक काँग्रेसकडून प्रस्ताव


या ठिकाणांचा भारत जोडो न्याय यात्रेत समावेश करण्याबाबत स्थानिक काँग्रेसकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राहुल गांधी यांनी दिल्ली गाठण्यासाठी नाशिकची वाट धरली आहे. 


मार्चमध्ये राहुल गांधी नाशकात


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या टप्प्यातील 'भारत जोडो यात्रा' मणिपूरमधून सुरू झाली आहे. सध्या ती आसाममध्ये पोहोचली आहे. मार्चच्या प्रारंभी ही यात्रा नाशिकला पोचणार आहे. या यात्रेचा समारोप मुंबईला होईल. याबाबत सध्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. यात्रेचा शेवटचा टप्पा मुंबई असून, नाशिकमधून ही यात्रा मार्गक्रमण होणार आहे. 


प्रस्तावाला सकारात्मक संकेत


यात्रेत खासदार राहुल गांधी यांनी ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देण्यासह गोदा आरती व कालिका मंदिराला भेटीचे नियोजन केले आहे. याशिवाय त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नसली तरी, सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. 


काँग्रेसकडून जोरदार तयारी


पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमधील काळाराम मंदिराला भेट दिली. तसेच गोदावरीची आरतीही केली. उद्धव ठाकरे यांनीही काळाराम मंदिरात दर्शन घेत गोदावरीची आरती केली. उद्धव ठाकरे यांनी अनंत कान्हरे मैदानावर सभा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यापाठोपाठ आता खासदार राहुल गांधीही काळारामचरणी लीन होणार आहेत. तसेच गोदामाईचे आशीर्वाद देखील घेणार आहेत. याकरिता काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे.


आणखी वाचा


Majha Katta : आधी मोदींशी तुलना, आता गोविंदगिरी महाराजांचं माझा कट्टावर पुन्हा बेधडक वक्तव्य,  म्हणाले, प्रभू रामाच्या समकक्ष दोघेच, ते म्हणजे...