मुंबई: मी लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा भक्त आहे, त्यांची तुलना फक्त प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णाशी होऊ शकते, इतरांसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण गोविंदगिरी महाराजांनी (Swami Govind Giri Maharaj) केलं. गोविंदगिरी महाराज हे एबीपी माझाच्या माझा कट्टा (Majha Katta) या कार्यक्रमात बोलत होते. 


अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी गोविंदगिरी महाराजांनी शिवरायांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर आता गोविंदगिरी महाराजांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणापासून भक्त आहे. त्यांच्या समकक्ष जगात फक्त प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण हेच आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना केली नाही.


 




मोदींनी कडक अनुष्ठान केलं


अयोध्येच्या कार्यक्रमावेळी ज्या काही मोजक्या लोकांनी भाषणं केली त्यामध्ये गोविंदगिरी महाराजांचा समावेश होता. मोदींनी या प्राणप्रतिष्ठेच्या आधी आपल्याशी संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलं. गोविंदगिरी महाराज म्हणाले की, अयोध्येच्या कार्यक्रमाच्या 20 ते 22 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क केला. त्यावेळी या कार्यक्रमासाठी काय अनुष्ठान केलं पाहिजे याची विचारणा केली. जे काही अनुष्ठान असतील त्याचे शास्त्रोक्त पालन करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. कुणी पंतप्रधान असं काही करेल याची अपेक्षा नव्हती. 


पंतप्रधान मोदींना आपण शेवटचे तीन दिवस कडक अनुष्ठान पाळण्याचा सल्ला दिला होता, पण मोदींनी सलग 11 दिवस त्याचं पालन केल्याचं गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं. या काळात मोदींनी केवळ लिंबू-पाण्याचं सेवन केल्याचं गोविंदगिरी महाराज म्हणाले. 


अविमुक्तेश्वर महाराज जे स्वतःला शंकराचार्य म्हणतात आणि त्यांनी अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावर प्रश्नचिन्ह उभं केला होता, ते शंकराचार्य नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शंकराचार्य पदवी लावण्याची परवानगी दिली नाही असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. 


अयोध्येच्या कार्यक्रमात काय म्हणाले होते गोविंदगिरी महाराज?


राम मंदिर अभिषेक सोहळ्यात बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. गोविंदगिरी महाराज म्हणाले की, तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज मला एका राजाची आठवण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते शिवाजी महाराज हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य करायचे नाही, मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे असे सांगितले. 


आज मला समर्थ रामदासांची आठवण झाली, त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले होते की, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे.


ही बातमी वाचा: