Prashant Kishor: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद ओळखावी– प्रशांत किशोर
Prashant Kishor: प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जाते.
प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जाते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रशांत किशोर यांच्यावरच भाजपच्या निवडणुकीच्या रणनीतीची जबाबदारी टाकली. प्रशांत किशोर यांच्या कल्पनेतूनच नरेंद्र मोदी यांच्या आभासी सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. एवढेच नव्हे तर, भाजपने केंद्रात स्वबळावर सत्ताही स्थापन केली. भाजपच्या त्या विजयामुळे प्रशांत किशोर यांचे नाव राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेला आले. मात्र, प्रशांत किशोर यांनीनंतर भाजपची साथ सोडली आणि विविध पक्षांना निवडणुकांमध्ये मदत केल्यानंतर आता ते काँग्रेससाठी काम करणार असल्याचे म्हटले जात असतानाच त्यांनी पुढील 10 वर्षे तरी भाजप मजबूत असेल असे वक्तव्य करून चांगलीच खळबळ माजवली. प्रशांत किशोर यांचे आडाखे खरे ठरत असल्याने त्यांच्या भाजपबाबतच्या वक्तव्यावरून अजूनही देशात भाजप मजबूत असल्याचेच चित्र समोर येत आहे. बरे प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी, नरेंद्र मोदी यांची ताकद समजून घेण्याचा सल्लाही राहुल गांधींना दिला.
महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी शिवसेनेचे काम पाहिले. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे काम पाहिले. भाजपने सगळी ताकद ओतूनही ममता बॅनर्जी यांना भाजप सत्तेवरून हटवू शकली नाही. निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी तर भाजप दोन आकडी संख्येच्या वर जाणार नाही. आणि जर गेली तर मी राजकीय संन्यास घेईन असे म्हटले होते. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केल्याने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर चिंतेत पडले होते. कारण पुढील वर्षी होणाऱ्या पंजाबमधील निवडणुकांसाठी त्यांनी प्रशांत किशोर यांनाच सल्लागार म्हणून नेमले होते.
पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ते ममता बॅनर्जी आणि अशा अनेक नेत्यांशी त्यांनी बैठका घेतल्या. या बैठकांनंतर ते काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. पण काँग्रेसमधून त्यांना विरोध झाला. आणि आता त्यांनी गोव्यात भाजपच्या ताकदीबाबत मोठे वक्तव्य केले. प्रशांत किशोर गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलसाठी काम करीत आहेत.
प्रशांत किशोर म्हणतात, देशात सध्या जे काही सुरु आहे त्यावरून नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचता येईल असा विचार करणेच चुकीचे आहे. असे काहीही होणार नाही. भाजपचा दबदबा अनेक दशके कायम राहाणार आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना भाजपसोबत बराच काळ लढाई लढावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद काय आहे हे राहुल गांधी यांनी अगोदर समजून घ्यायला हवे असा सल्लाही त्यांनी राहुल गांधींना दिला.
प्रशांत किशोर पुढे म्हणालेत, नरेंद्र मोदींचे युग संपेल अशी वाट पाहात राहाणं ही राहुल गांधी यांची मोठी चूक आहे. लोकांनी असे समजू नये की, फक्त नरेंद्र मोदी म्हणजेच भाजप आहे आणि त्यांच्यामुळेच भाजप सत्तेवर राहील. भाजप पुढील अनेक वर्ष सत्तेवर राहाणार आहे. लोकांनी मोदींना हटवले तरीही भाजपच सत्तेवर राहाणार आहे. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकत काय आहे ते समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. नरेंद्र मोदी लोकप्रिय का आहेत? याची माहिती घेणे आवश्यक असल्याचेही प्रशांत किशोर यांनी म्हटले.
संबंधित बातम्या-