(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस पक्ष म्हणजे वास्तव्यापासून दूर गेलेला पक्ष, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
Radhakrishna Vikhe Patil On Congress: ''काँग्रेस पक्ष म्हणजे वास्तव्यापासून दूर गेलेला पक्ष आहे. देशाच्या धोरणाशी पूर्ण विसंगत धोरणे राबवता- राबवता काँग्रेस पक्षाची काय दयनीय अवस्था झाली आहे: राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil On Congress: ''काँग्रेस पक्ष म्हणजे वास्तव्यापासून दूर गेलेला पक्ष आहे. देशाच्या धोरणाशी पूर्ण विसंगत धोरणे राबवता- राबवता काँग्रेस पक्षाची काय दयनीय अवस्था झाली आहे. हे सर्वजण पाहत आहेत'', असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, ''देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगती ही प्रचंड वेगाने होत आहे. आपल्या आजूबाजूचे देश श्रीलंका आणि पाकिस्तान यांची काय अवस्था झाली आहे, हे आपण पाहतो. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला दूरदृष्टी नेतृत्व मिळालं आहे.''
राहुल गांधी यांच्या पदयात्रेबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांची पदयात्रा देशाला नवीन नाही. राजकीय पक्षांनी पदयात्रा काढणं हा त्यांचा अधिकारच आहे. मात्र राहुल गांधी पदयात्रा कोणत्या मुद्द्यावर काढणार? ज्या पक्षाचं याआधी राज्यात सरकार होतं त्यावेळी इंधनाचे दर कमी करता आले नाही. बेरोजगारी संदर्भामध्ये कुठलंही काम झालं नाही. मग राहुल गांधी कोणत्या मुद्द्यावर पदयात्रा काढणार? असा सवाल करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.
राज्यातील काँग्रेस नेत्यांवर देखील राधाकृष्ण विखे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गेल्या सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते हे सत्तेत गेले. त्यावेळी त्यांच्याकडे पक्षाचा अजेंडा नव्हता. तर त्यांच्याकडे स्वतःचा अजेंडा होता. सरकारमध्ये असताना एवढी अपमानित वागणूक पक्षाला मिळाली, तरी देखील गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांसारखे हे सत्तेत बसून राहिले.
वाळू तस्करी संदर्भामध्ये बोलताना राज्यात येत्या एक महिन्याच्या आत एक सर्वंकष धोरण आणण्याचे माझे नियोजन असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. वाळू तस्करीमुळे गावात दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, गुंडगिरी ही वाढत आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भामध्ये एक धोरण आणण्याचा माझा विचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती कधी होणार याबाबत बोलताना लवकरच या संदर्भामध्ये निर्णय होईल मात्र पालकमंत्री नसल्याने सरकारचा कोणतही काम थांबलेलं नाही, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाल, सध्या राज्यातील विरोधी पक्ष हा सरकार वरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत आहे. त्यावर बोलताना सत्ता गेल्याने त्यांना वैफल्य आल्याचं राधाकृष्ण विखे यांनी म्हटले.