Murlidhar Mohol & Ravindra Dhangekar: पुण्याचा जाग्यामोहोळ! धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं, जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती
Pune Jain Boarding house: पुण्यातील जमीन विक्रीच्या व्यवहारावरुन प्रचंड वाद निर्माण झाला होता. जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती

Murlidhar Mohol & Ravindra Dhangekar: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री व्यवहारावरुन शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा खासदार मुरलीधर मोहोळ यांना डिवचले आहे. रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे व्यंगचित्र असून त्यावर 'पुण्यातील जागा गिळणारे जाग्यामोहोळ' असा मजकूर लिहण्यात आला आहे. यावर आता मुरलीधर मोहोळ काही प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ते वेगवेगळे विषय काढून लक्ष विचलित करतील, आपण मात्र #SaveHND मुद्द्यावर ठाम राहायचं..! समस्त पुणेकर सगळ्या जैन समाजाच्या सोबत आहेत, कारण आज वेळ जैन समाजावर आली आहे याकाळात आपण एकत्र नाही आलो तर उद्या सर्वांची धार्मिकस्थळे अशीच लाटली जातील..! I Repeat ... एकही वीट हलवू द्यायची नाही, असेही रविंद्र धंगेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Pune Jain Boarding house: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती
पुण्यातील शिवाजीनगर येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे. जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळाने ठराव मंजूर करुन ही जागा गोखले बिल्डर्सना विकली होती. यावरुन प्रचंड गदारोळ झाल्यानंतर या जमीन विक्री व्यवहाराबाब संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जैन समाजाच्या संघर्षाला न्यायालयीन पाठबळ मिळालं असून जागेच्या विक्रीला तातडीचा ब्रेक लागला आहे. सह धर्मदाय आयुक्त यांनी एक निरीक्षक नेमण्याचे आदेश दिले आहेत. निरीक्षकाकडून संबंधित जागेवर जाऊन पाहणी करून अहवाल देण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण
खासदार मोहोळ यांनी या सर्व आरोपांना विरोध केला असून म्हटलं की, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले होते.
आणखी वाचा
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळला, सगळंच सांगून टाकलं

























