Pune Election 2026: अजित पवारांचा पक्ष आंदेकर कुटुंबातील दोघांना उमेदवारी देण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे मोठे संकेत
Pune Election 2026: कुख्यात गुंड बंडू आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी देण्याचे संकेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत.

Pune Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Election) कुख्यात गुंड बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्या कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar) आणि सोनाली आंदेकर (Sonali Andekar) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे शहराध्यक्ष सुभाष जगताप (Subhash Jagtap) यांनी पुन्हा एकदा संकेत दिले आहेत.
दोघींना निवडणूक लढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी न्यायालयाने परवानगी दिली आहे. पोलिस रिमांड रिपोर्टनुसार, या दोघींचा आयुष कोमकर हत्याप्रकरणात थेट सहभाग नाही, फक्त बंडू आंदेकर यांच्या घरात कट रचण्यात त्यांचा नाममात्रचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणास्तव अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारीबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत सुभाष जगताप यांनी दिले आहेत.
Pune Election 2026: कोमकर कुटुंबाकडून तीव्र प्रतिक्रिया
हत्याकांडाच्या पीडित आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी राजकीय पक्षांना विनंती केली आहे की, आंदेकर कुटुंबाच्या सदस्यांना निवडणुकीत तिकीट देऊ नका. संजीवनी कोमकर म्हणाल्या, “जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तरी आमच्यावर अन्याय होऊ नये. आंदेकरांना निवडणुकीचे तिकीट दिले गेले तर मी आत्मदहन करण्यास तयार आहे,” असा इशारा त्यांनी दिलाय.
Pune Crime: नेमकं काय आहे प्रकरण
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येने आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळले. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरुद्ध खून व मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्याचप्रमाणे, बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हत्येनंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने “कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल,” असा दावा केला होता. यानंतर कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
दरम्यान, आंदेकर कुटुंबाच्या महिलांना उमेदवारी दिल्यास पुण्यातील राजकीय वातावरण तापू शकते, तर कोमकर कुटुंबाची तीव्र प्रतिक्रिया समाजात संताप निर्माण करू शकते. आता राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबाच्या महिलांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा























