President Election: खेळ अजून संपलेला नाही, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून ममता यांचं सूचक विधान
President Election: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.
President Election: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही भारतीय जनता पक्षाला (BJP) आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपे जाणार नसल्याचं ममता बॅनर्जी बुधवारी म्हणाल्या आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांच्याकडे एकूण आमदारांपैकी निम्मेही आमदार नाहीत. देशभरात विरोधी पक्षांकडे जास्त आमदार आहेत. आमच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही (भाजप) पुढे जाऊ शकत नाही. हे विसरू नका, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, ''खेळ अजून संपलेला नाही, त्यांनी (भाजप) मोठ-मोठ्या गोष्टी बोलू नये. गेल्या वेळच्या तुलनेत पराभव होऊनही समाजवादी पक्षासारखे पक्ष मजबूत स्थितीत आहेत.'' राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून घेतल्या जातात. ज्यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संसदेचे आणि विधानसभांचे निवडून आलेले सदस्य समाविष्ट असतात.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा टक्कर देण्यासाठी भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''देश केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी लढण्याची तयारी करत आहे.'' अर्थसंकल्पीय चर्चेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल राज्य पोलिसांचे कौतुक केले आहे. विरोधकांनी केलेल्या राजकीय हिंसाचाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
चार राज्यात विजय मिळवून ही भाजपसाठी राष्ट्रपती निवडणूक कठीण
प्रत्येक वेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. कारण येथून निवडून आलेल्या आमदारांचे मत मूल्य सर्वाधिक असते. लोकसंख्येच्या बाबतीत यूपी हे देशातील सर्वात मोठे राज्य आहेत. या राज्याचे मत मूल्यही सर्वोच्च आहे. यूपीमध्ये भाजपने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केली असली तरी, पक्षाला अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्याचा थेट परिणाम राष्ट्रपती निवडणुकीवर होऊ शकतो. यावेळी भाजपने यूपीमध्ये 57 जागा गमावल्या आहेत. त्याच वेळी उत्तराखंडमध्ये भाजपला 9 जागा कमी मिळाल्या आहेत. आधी भाजप बहुमताच्या आकड्याच्या अगदी जवळ होती, आता मात्र परिस्थिती बदलली आहे.