मुंबई - राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. दुसरीकडे राज्य सरकारने राज्यातील 27 महामंडळांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य म्हणून अनेकांना संधी दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या राजी-नाराजी नाट्यापूर्वीच अनेकांचं बंड थमवण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रशांत परिचारक यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून प्रशांत परिचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याची चर्चा रंगली आहे.
राज्य सरकारने याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यामध्ये विविध महामंडळांच्या निर्माणाची घोषणा केली होती. त्यात, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय (नियोजन विभाग) कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. त्यानुसार आज आशिष दामले यांची निवड करण्यात आली तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 मधील कलम 12 (2)(ब)मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. 1 अन्वये ही निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महामंडळावर निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. तर, पंढरमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या प्रशांत परिचारक यांना सहकार कृषी पणन महामंडळाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.
राज्यातील 27 महामंडळांवर नियुक्त्या
महाराष्ट्र रोजगार हमी परिषद - शहाजी पवार, अध्यक्ष
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ - दिलीप कांबळे, अध्यक्ष
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती - सचिन साठे, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग - सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान उपाध्यक्ष
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ - निलय नाईक, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ - अरविंद पोरट्टीवार, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ - प्रशांत परिचारक, अध्यक्ष
मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ - इद्रिस मुलतानी, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ - प्रमोद कोरडे, अध्यक्ष
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद - प्रमोद कोरडे, अध्यक्ष
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ - विजय वडकुते अध्यक्ष,
बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ - अतुल काळसेकर, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ - राजेश पांडे, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ - गोविंद केंद्रे, अध्यक्ष
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) - बळीराम शिरसकर, सदस्य
राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ - दौलत नाना शितोळे, उपाध्यक्ष
महाराष्ट्र वन विकास महामंडळ - अतुल देशकर, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती - नरेंद्र सावंत, अध्यक्ष
महिला आर्थिक विकास महामंडळावर (माविम) - मिनाक्षी शिंदे,अध्यक्षा, राणी द्विवेदी, उपाध्यक्ष
आदिवासी विकास महामंडळ - काशिनाथ मेंगाळ, अध्यक्ष
कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ - विजय चौगुले, उपाध्यक्ष
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई - अजय बोरस्ते, उपाध्यक्ष
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांवर - आनंद जाधव, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ - कल्याण आखाडे, उपाध्यक्ष
राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ - श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य ग्राहक सरेक्षण परिषद - संदीप लेले अध्यक्ष, अरुण जगताप उपाध्यक्ष
हेही वाचा