छत्रपती संभाजीनगर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीपूर्वी राज्यातील प्रमुख पक्षांनी अंतर्गत सर्वेक्षणांच्या (Vidhan Sabha Election Survey) माध्यमातून जनमताचा आढावा घेतला होता. मात्र, तरीही प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार, याबाबत सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक निकालापर्यंत कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महत्त्वाचे भाकीत वर्तविले आहे. त्यांनी सध्या कोणत्या नेत्यांचे ग्रहमान (Astrology) चांगले आहे आणि कोणासाठी चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे, याबाबतही भाष्य केले आहे.


वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी हे सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे प्रचंड व्यग्र आहेत. निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेते कुंडली शुद्ध करुन घेतात. त्यासाठी बगलामुखी, सुदर्शन याग, शतचंडी हे यज्ञ आणि बटुक भैरव यासारखी अनुष्ठानं करण्याकडे नेत्यांचा कल आहे. इच्छाशक्ती, स्वबळ आणि आकर्षण वाढवण्यासाठी हे अनुष्ठान केले जाते. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याचा शुभमुहूर्त शोधण्यासाठीही राजकीय नेते ज्योतिषांकडे जात आहेत. ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या कुंडलीचाही अभ्यास केला आहे. यावरुन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी काही भाकितं वर्तविली आहेत.


 विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार?


ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे भाकीत वर्तविताना राजकीय पक्षाचे बळ, पक्षप्रमुखाचे ग्रहमान आणि तो उमेदवार किती प्रबळ आहे, यावर अनेक गोष्टी ठरतात. ज्योतिषशास्त्रानुसार महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांचे बळ काठावर आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कुंडलीनुसार त्यांचे ग्रह प्रबळ आहेत. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कुंडली संमिश्र ग्रहमान दर्शवित आहे. शरद पवार गट आणि  काँग्रेस पक्षाचेही ग्रहमान चांगले असून त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगल्या जागा मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार राज्यात पुन्हा महायुती सरकारच सत्तेत येईल, असा अंदाज ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी वर्तविला आहे.


कोणत्या राशीच्या उमेदवारांनी कधी अर्ज दाखल करावेत?


ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राजकीय नेत्यांनी आपापल्या राशीनुसार कधी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, याविषयी मार्गदर्शन केले आहे. मिथुन, सिंह, कुंभ, राशीच्या राजकीय नेत्यांनी 22 व 23 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करावा. कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशीच्या इच्छूक उमेदवारांनी 24 आणि 25 तारखेला उमेदवारी अर्ज भरावेत. सिंह, तूळ, मेष, धनु राशीच्या इच्छुक उमेदवारांनी 26 आणि 27 या तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करावा. कन्या, वृषभ, वृश्चिक, मकर राशीच्या इच्छुक उमेदवारांनी 28 आणि 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करावा. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रामुख्याने प्रत्येक इच्छूक उमेदवारने आपल्या चंद्रबळ अनुकूल कधी आहे, हे पाहून उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले. 


VIDEO: Vidhansabha Election Prediction 



आणखी वाचा


20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे