पुणे: गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या चिन्हामुळे काही ठिकाणी फटका बसला होता. त्यांचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे, मात्र, अशाच प्रकारचे पिपाणीचे चिन्हं काही उमेदवारांना मिळाल्याने त्यावेळी मतदारांचा गोंधळ उडाल्याने काही ठिकाणी मतांचा फटका बसला होता. यावेळी असा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे तीन विनंत्या केल्या होत्या. त्यापैकी दोन मागण्या निवडणूक आयोगाने मान्य केल्या आहेत. मात्र, पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस ही दोन चिन्ह वेगळी आहेत, त्यामुळे पिपाणी चिन्ह बाद ठरवता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे, याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पिपाणी चिन्हावर काय म्हणाले रोहित पवार?
निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह कायम ठेवले असले तरी त्याचा लोकसभेसारखा परीणाम विधानसभेत होणार नाही कारण लोकांना तुतारी वाजवणारा माणूस हे पवार साहेबांचे चिन्ह आहे हे आता समजले आहे. लोकसभेला काहींना त्यांचा फायदा झाला. असंही म्हणावं लागेल तो फायदा करून घेतला. आता या सर्व खेळी नागरिकांना समजलेल्या आहेत. लोक हुशारीने तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाच्या मागं उभी राहतील.
त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली आहे. याबाबत बोलताना आज आमदार रोहित पवार म्हणाले, निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत, आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करत आहोत. त्यामुळे निवडणुकांची वेगळी अशी तयारी करण्याची गरज नाही केवळ लीड वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
काय होत्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या तीन विनंत्या?
पहिली विनंती : राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती. निधी स्वीकारण्यास मान्यता द्यावी
निवडणूक आयोगाचा निर्णय: ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
दुसरी मागणी : तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह, वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करावं
निवडणूक आयोग : वोटिंग मशीनवर चिन्ह कसं दिसावं, त्यांनी तीन पर्याय दिले होते, त्यापैकी पहिला पर्याय स्वीकारला आहे.
तिसरी मागणी: ट्रम्पेट हटवावं
निवडणूक आयोग : तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं त्यामुळं हटवता येणार नाही हे सांगितलं.
अमित शाह यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या आमदारांनी त्याग केला असं म्हंटलं त्यावरून रोहित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांना चिमटा काढला, यापूर्वी महाराष्ट्राच्या जागा ठरवण्यासाठी दिल्लीतील नेते महाराष्ट्रात यायचे पण आता महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत जावं लागत यावरून महाराष्ट्राची लेव्हल काय झाली हे लक्षात येतं, शाह यांनी शिंदे यांना एक प्रकारे संदेश दिला आहे, की अडीच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री राहिलात आता बस झालं असा टोला रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.