Praniti Shinde on Walmik Karad : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप केला जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत, गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत म्हणजेच महाराष्ट्राचा युपी बिहार करत आहेत. देशमुखांच्या मुलीने पोलीस संरक्षण मागितले. मात्र, तिला संरक्षण दिले नाही. म्हणजे बीडमध्ये प्रचंड दहशतीचा वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखती देत आहेत. त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला जातो मग सामान्यांना न्याय कसा मिळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे
विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत विचारले असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी 100 टक्के राजीनामा दिला पाहिजे, कारण ते यात आहे असे दिसते. काँग्रेसच्या काळात जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो. लोकांच्या दबावापोटी दोष नसला तरी राजीनामे दिले जात होते. मात्र हे अहंकारी सरकार आहे ते राजीनामा देणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केलाय.
लाडक्या बहिणींना सावत्र करू नये
लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. याबाबत विचारले असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठीचा चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. लाडकी बहीणमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे, असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत.लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे, तिला सावत्र करू नये, असे म्हणत त्यांनी सरकार निशाणा साधला.
आणखी वाचा