बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने धनुभाऊंच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार आहे. मात्र, आता वाल्मिक कराडच्या राजकीय हितसंबंधांचे धागेदोरे आता अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण अजित पवार ज्यादिवशी मस्साजोगला गेले होते, त्यादिवशी त्यांच्या ताफ्यात असणाऱ्या गाडीनेच वाल्मिक कराड हा पुणे सीआयडी कार्यालयात आल्याचा दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. याच मुद्द्यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये अजित पवार यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले, त्या गाडीचे गुपित बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
  
अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला.  त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे! तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, याहीपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकारांनी मला असे सांगितले की, "आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय. आम्ही उद्या मुंबई,  पुण्याला निघून जाऊ , कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने आमच्या मागे लागले आहेत."  वा रे... वाह ! आधुनिक महाराष्ट्र, असेही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.




आणखी वाचा


वाल्मिक कराडला सोयी सुविधा, बाहेरच्या लोकांना भेटायला मुभा; संतोष देशमुखांच्या भावालाही अरेरावी ; एपीआय दराडेंवर धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप