Goa CM: गोव्यात पुन्हा एकदा प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री होणार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत गोव्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. यानंतर प्रमोद सावंत यांनी आज दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे की, ''आम्हाला पुन्हा राज्याची सेवा करण्याचा जनादेश दिल्याबद्दल आमचा पक्ष गोव्यातील जनतेचा ऋणी आहे. आगामी काळात गोव्याच्या प्रगतीसाठी आम्ही काम करत राहू.'' दरम्यान, प्रमोद सावंत हे दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या 40 जागा असलेल्या गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्री बनवण्यात येणार नाही.
महाविद्यालयाचे सरचिटणीस (GS) ते मुख्यमंत्री, असा होता प्रवास
डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द कोल्हापुरातूनच सुरू झाली. जेव्हा ते येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीस (GS) पदाची निवडणूक जिंकून आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. बारावीपर्यंत गोव्यात शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी 1991 मध्ये कोल्हापूरच्या रंकाळवेश दुधाळी परिसरात असलेल्या गंगा आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी ते रंकाळा परिसरात भाड्याने राहत होते.
प्रमोद सावंत यांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांच्या महाविद्यालयातील मित्र परिवाराने त्यांना 1992 मध्ये सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी जिंकले. यातून खर्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1997 मध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ ही पदवी मिळवली. त्यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
संबधित बातम्या: