Goa CM: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारत 20 जागा जिंकल्या आहे. मात्र गोव्यात विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान प्रमोद सावंत हेच गोव्याचे मुख्यमंत्री असतील, अशी बातमी समोर आली आहे. गोव्याच्या भाजप आमदारांनी पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. याआधी गोवा विधानसभेच्या 39 नवनिर्वाचित सदस्यांनी मंगळवारी शपथ घेतली. नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन बोलावले होते. श्रीधरन यांनी विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी सोमवारी नवनिर्वाचित आमदार गणेश गावकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. 40 सदस्यीय गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि 10 मार्च रोजी निकाल जाहीर झाला.


गावकर यांनी मंगळवारी सभागृहात निवडून आलेल्या 39 सदस्यांना शपथ दिली. आमदारांनी त्यांच्या सोयीनुसार कोकणी, मराठी किंवा इंग्रजी भाषेत शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाने (भाजप) 40 सदस्यांच्या विधानसभेत सर्वाधिक 20 जागा जिंकल्या होत्या. असे असले तरी भाजपकडे बहुमताचा 21 हा आकडा नाही आहे. भाजपने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभेबाहेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी दावा केला की, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकार न बनवता आमदारांनी शपथ घेतली. याआधी शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन आमदार दुचाकीवरून विधानसभा भवनात पोहोचले होते. 


गोवा विधानसभेत यावेळी तीन जोडपीही दिसणार आहेत. यात विद्यमान भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि त्यांची पत्नी दिव्या राणे यांचाही समावेश आहेत. विश्वजीत राणे यांनी 8,085 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. दरम्यान, भाजपकडून विश्वजित राणे हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर राज्यपालांची भेटही घेतली होती.  


संबधित बातम्या: