Mamata Banerjee on Election Result : पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रथमच गोव्यात तृणमूल काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, निवडणुकीच्या 3 महिन्यापूर्वी तृणमूल काँग्रेस गोव्यात लॉन्च झाली होती. तरीदेखील तृणमूल काँग्रेसला गोव्यात 6 टक्के मते मिळाली असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितले.
गोवा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल कोणतेही दुःख नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. पक्षाला 6 टक्के मते मिळणे, ही चांगली कामगिरी असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, त्यांची तयारी गोव्यासारख्या छोट्या राज्यांतील विजयासाठी नाही, तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आहे. ममता बॅनर्जी आधीच 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहेत. आता पुन्हा एकदा याचाच संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
2024 साठी ममता बॅनर्जींची तयारी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपविरोधात लढू इच्छिणारे सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात. काँग्रेस आपली विश्वासार्हता गमावत आहे. त्यामुळे काँग्रेसवर अवलंबून राहता येणार नाही असे ममता बॅनर्दी म्हणाल्या. काँग्रेसची इच्छा असेल तर आपण सर्वजण 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका एकत्र लढू शकतो. सध्या आक्रमक होऊ नका, सकारात्मक राहा. 2022 च्या निवडणुकीचे निकाल 2024 च्या निवडणुकीचे भवितव्य ठरवतील. यूपी निवडणुकीचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, ईव्हीएमची लूट झाली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी खचून न जाता त्यांनी ईव्हीएम मशीनची फॉरेन्सिक तपासणी करुन घ्यावी असेही त्या म्हणाल्या. अखिलेश यादव यांच्या मतांची टक्केवारी 20 टक्क्यांवरुन 37 टक्के झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर ममता बॅनर्जी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल सतत आवाज उठवत आहेत. यासंदर्भात त्यांनी दिल्लीतील अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर भाजपच्या विरोधात एकत्र निवडणुका लढण्याचे आवाहनही त्या करत आहेत. याशिवाय टीएमसीच्या अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जींना पीएम मोदींसाठी आव्हान असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा बनण्याचा ममता यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेसला कमकुवत म्हणत विरोधी पक्षांना एकजूट होण्यासाठी त्या सातत्याने सांगत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: