Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर; मविआशी युतीची बोलणी फिस्कटणार?
Vanchit Bahujan Aghadi: महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीचे मला निमंत्रण नाही. 6 मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण.पुण्यात मोदीबागेत नेहमी जातो. माझ्या दोन मेव्हण्या तिथे राहतात, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अकोला: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची (Loksabha Election 2024) बोलणी सुरु असल्याच्या बातम्याही अधुनमधून येत होत्या. मात्र, मविआ आणि वंचितचे (VBA) जागावाटपाचे सूत्र निश्चित होऊ शकले नव्हते. परंतु, आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी परस्पर लोकसभेच्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. त्यामुळे आता वंचित आणि मविआतील बोलणी फिस्कटल्याचे दिसत आहे. आता मविआला प्रकाश आंबेडकरांची मनधरणी करण्यात यश न मिळाल्यास 2019 प्रमाणे वंचित बहुजन आघाडी पुन्हा 'एकला चलो रे'च्या भूमिकेत दिसेल.
प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या कोणत्या जागांवर उमेदवार जाहीर केले?
प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेच्या तीन जागांवरील वंचितचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर लढतील. तर वंचितकडून वर्धा येथे प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मविआचे नेते हे परस्पर झालेले जागावाटप मान्य करुन वंचितला आपल्यात सामावून घेणार का, हे पाहावे लागेल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीशी युती होणार का, असा प्रश्नही पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, आम्हीदेखील त्याबाबत अद्याप संभ्रमात आहोत. आम्ही मविआचा भाग आहोत किंवा नाही, हेच आम्हाला कळत नाही, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मविआसोबत जुळलं नाही तर पुढचं काहीच सांगू शकत नाही: प्रकाश आंबेडकर
आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती मविआकडे दिली. मविआने 15 जागा ओबीसी आणि 3 अल्पसंख्याकांना द्यावा. माध्यमांमध्ये आमच्या मुद्द्यांना आमच्या अटी म्हणून सांगितलं गेलं, मात्र हे तसं नव्हे. मविआला आम्ही आमचं म्हणणं मांडलंय. त्यांनी निर्णय घ्यावा. कार्यकर्ते उत्साही असतात. आमच्या पक्षात भांडणं वाढू नये, डोकेदुखी वाढू नये म्हणून मविआच्या बैठकीला जाऊ नका असे सांगितल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 6 तारखेपर्यंत सारं काही सुरळीत होईल, या वडेट्टीवारांच्या वक्तव्याबद्दल माहीत नाही. त्यांच्यातील 15 जागांवरचा तिढा सुटला तर पुढे पाहू. एकटं लढलो तर आमची लढत भाजपसोबत. मविआसोबत नाही जुळलं तर सध्या काहीच सांगू शकत नाही. मी अकोल्यातूनच लढणार. मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यात येऊन लढावं. पुढच्या मविआच्या बैठकीचं निमंत्रण नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
आणखी वाचा