(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना जेलमध्ये का पाठवलं गेलं? पंतप्रधान मोदींचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
PM Modi on Arvind Kejriwal: पंतप्रधान मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या अटकेसंदर्भात वक्तव्य केलं आहे.
PM Modi on Arvind Kejriwal : नवी दिल्लीः ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. एका वृत्त समुहाच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या अटकेसंदर्भात वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदींना निवडणूक प्रक्रिया सुरू असताना झारखंड आणि दिल्लीच्या दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक का करण्यात आली? असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्ही त्यांना कारागृहात पाठवलेलं नाही, न्यायालयानं दोन्ही मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवलं, असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतीय टेलिव्हिजनच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात भाग घेतला आणि इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक रजत शर्मा यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना झारखंड आणि दिल्लीच्या दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक का करण्यात आली? असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आम्ही त्यांना तुरुंगात पाठवलेलं नाही. न्यायालयानं दोन्ही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवलंय. ना आम्ही कोणाला तुरुंगात पाठवतो, ना माझ्याकडे कोणाला तुरुंगात पाठवण्याचा अधिकार आहे. आमच्याकडे अधिकार नाही. कुणालाही तुरुंगात पाठवण्याचा न्यायालयाला अधिकार आहे."
पंतप्रधान मोदींकडून कोर्टाची टिप्पणीचा आधार
रजत शर्मा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं? माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालय काय म्हणाले? हे सर्वांना माहीत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केलेलीही लोकांनी पाहिली आहे."
ईडीकडून 2200 कोटींची रोकड जप्त
पंतप्रधान मोदींनी ईडीचं कौतुक केलं आणि सांगितलं की, 10 वर्षात 2200 कोटी रुपये रोख रक्कम जप्त केल्याबद्दल आपण सर्वांनी ईडीचा आदर केला पाहिजे. ईडीनं वसूल केलेली रक्कम किमान 70 टेम्पोमध्ये भरली जाऊ शकते. तर यूपीएच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत ईडीनं केवळ 34 लाख रुपये रोख जप्त केले होते, जे शाळेच्या बॅगमध्येही भरता आले असते.
दिल्ली दारू घोटाळ्यावर काय म्हणाले मोदी?
शाळांजवळ दारूची दुकाने उघडून मुलांचे आयुष्य खराब करायचंय, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला. कमिशन मिळत असल्यानं विकल्या गेलेल्या प्रत्येक बाटलीमागे वाईनची मोफत बाटली देऊ केली. 2014 च्या निवडणुकीत मी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंच जिंकलो, हे मी स्पष्ट करतो. माझं सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी काम करतंय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.