सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र असताना हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी याना मैदानात उतरवण्यातं ठरवलं आहे. येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे माळशिरस म्हणजे मोहिते पाटील यांच्या (Dhairyasheel Mohite Patil) होमग्राऊन्डवर सभा घेणार आहेत. 


माळशिरस येथे 1 लाख लोकांची विराट सभा घेतली जाणार असून यासाठी भाजपसह सर्व मित्रपक्ष तयारीला लागले असल्याची माहिती माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. या सभेसाठी पंतप्रधान मोदींसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक नेते हजेरी लावणार आहेत. 


गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी अकलूज येथे पंतप्रधान मोदी यांची अशीच विशाल सभा घेऊन दाखवली होती. आता मोहिते आणि उत्तम जानकर सोबत नसताना त्यांच्या विरोधात तशीच मोठी सभा घेणे हे भाजपासाठी मोठे आव्हान असणार आहे. 


भाजपच्या रणजित निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटलांना आधी उत्तम जानकर आणि नंतर फलटणच्या निंबाळकर परिवाराची साथ मिळाल्याने शरद पवारांचं पारडं जड झाल्याचं चित्र आहे. 


मोहिते पाटील-जानकरांना धक्का देणार?


माळशिरस हा मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे भाजपने माळशिरस येथेच मोदींची सभा घेण्याची तयारी केल्याने मोहिते पाटील आणि जानकर यांच्यासाठी हा मोठा झटका असणार आहे. आमदार जयकुमार गोरे, आप्पासाहेब देशमुख, राजकुमार पाटील के के पाटील यांनी माळशिरस येथील कृषी विभागाच्या जागेची पाहणी करीत येथे कामाला सुरुवात केली आहे. एकूण 60 एकरापेक्षा मोठ्या असणाऱ्या या मैदानावरील 28 एकर जागेत ही सभा होणार असून इतर जागा पार्किंगसाठी वापरण्यात येणार असल्याचं आमदार गोरे यांनी सांगितलं.


माळशिरस येथील नरेंद्र मोदीची सभा इतिहास घडवणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. माढा लोकसभेसाठी माळशिरस येथील या सभेच्या तयारीसाठी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नातेपुते येथे भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केलं. त्यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत एक बैठक घेतली. यावेळी नातेपुते येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला. मोदींनी केलेल्या विकास कामावर आपला उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येऊ शकतो यासाठी सर्वांनी हे विकासकामं तळागाळापर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


ही बातमी वाचा: