सोलापूर : भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणे बंद झाले असून गेले कित्येक दिवस प्रयत्न करून फडणवीस यांची साधी भेट देखील होऊ शकत नसल्याने अस्वस्थ झालेले संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. संजय क्षीरसागर हे मोहोळमधील धनगर नेते असून त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला धक्का बसला आहे तर माढ्यात (Madha Lok Sabha Election) शरद पवारांचं बळ वाढलं आहे.
तरुण वयात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी , गोपीनाथ मुंढे अशा नेत्यांच्या विचाराने भारावून काम केलेल्या संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे रोपटे लावले, त्याला मोठे केले. मात्र पक्षातील दोन नेत्यांनी फडणवीस यांचे कान भरल्याने त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत भावनिक झालेल्या संजय क्षीरसागर यांनी आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले. गेली 26 वर्षे ज्या पक्षासाठी एक एक कार्यकर्ता जोडून मोठी व्होट बँक तयार केली तोच पक्ष सोडून जाताना संजय क्षीरसागर यांचे डोळे पाणावले होते.
एकामागून एक नेत्यांची भाजपला सोडचिठ्ठी
गेल्या काही दिवसापासून भाजप वाढवण्यासाठी घाम गळणारे एका पाठोपाठ एक बडे धनगर नेते भाजपला सोडून राष्ट्रवादीत चालल्याचं चित्र आहे. सुरुवातीला शिवाजी कांबळे यांनी माढा तालुक्यातून अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यामुळे भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. नंतर माळशिरस तालुक्यातून उत्तम जानकर यांनीही भाजपच्या धोरणावर सडकून टीका करत शरद पवार गटात प्रवेश केला.
करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनीही अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे यांच्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केला. यात संजय क्षीरसागर यांचे नाव मात्र भाजपासाठी मोठा धक्का मनाला जात आहे . क्षीरसागर कुटुंब अनेक वर्षांपासून भाजप वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते .
मोहोळ तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत काम करून सत्तेच्या साडेसात वर्षात आमच्या तालुक्याला साडेसात रुपयाचाही निधी मिळवू शकलो नसल्याची खंत संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केली. आपण पक्षाचा लाभार्थी नसल्याने आपल्याला कोणतीही भीती नसली तरी माझ्या मागे गेली 26 वर्षे निष्ठेने उभारलेल्या कार्यकर्त्यांना मी काय दिले हा प्रश्न मला अस्वस्थ करीत होता. यानंतर तालुक्यातील 140 गावांचा दौरा केल्यावर कार्यकर्त्यांनी आता भाजपाला आपल्यासारख्या निष्ठावंतांची गरज राहिली नसल्याने महाविकास आघाडीत जाण्याचा सल्ला दिल्याचे क्षीरसागर सांगतात.
जिल्ह्यातील दोन नेत्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं
इतकी वर्षे जो पक्ष वाढवायचा प्रयत्न केला त्या पक्षात आपल्याला जिल्ह्यातील दोन नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या जबाबदार लोकांना बोलण्यासाठी मुंबई येथे खूप हेलपाटे मारले. मात्र गेल्या महिनाभरात फडणवीसांनी मला साधी भेटही दिली नसल्याची खंत संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केली. आता मात्र माघार नाही असे सांगत माढा लोकसभेतून धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेतून प्रणिती शिंदे याना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादीतून आमदार होऊन दाखवणार असा दावाही क्षीरसागर यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत संजय क्षीरसागर यांचे थोरले बंधू नागनाथ क्षीरसागर याना 68 हजार 833 मते मिळाली होती.
भाजपने महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सामील करून घेतल्यानंतर भाजपचे वर्षानुवर्षे काम करणारे सर्व ताकदवान धनगर नेते बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. मोहोळ येथील आमदार यशवंत माने हे अजित पवार गटाचा असल्याने महायुतीत हे तिकीट अजित पवार गटाला जाणार आहे. यामुळेच संजय क्षीरसागर यांना भाजपमधून भवितव्यच राहिलेले नाही.
सोलापूर जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या संख्येने असून हा पारंपरिक भाजपचा मतदार होता. आता भाजपच्या धोरणामुळे हे सर्व बडे नेते भाजप सोडून जात असताना आपले निष्ठावंत नेते का पक्ष सोडत आहेत याची साधी विचारपूस देखील करण्यास वेळ नसल्याचा आरोप या नेत्यांनी केला. सोलापूर जिल्ह्यात आता माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ या चार तालुक्यात नव्याने पक्ष उभारणी करण्याची वेळ भाजपवर येणार आहे.
ही बातमी वाचा: