Amit Shah On Uddhav Thackeray अमरावती : काँग्रेसने (Congress) या देशात 60 ते 70 वर्ष राज्य केलं. मात्र, या कार्यकाळात त्यांनी कधीही राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) होऊ दिलं नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सत्तेत येताच त्यांनी अवघ्या पाच वर्षात राम मंदिराचा प्रलंबित विषय न्यायालयातून मार्गी लावला. भूमिपूजनही केलं आणि मोठ्या थाटामाटात प्रभू श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठापना करून जय श्रीराम देखील केलं. मात्र दुसरीकडे स्वतःला शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून घेणारे नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण देऊन देखील केवळ काँग्रेस आणि सोनिया गांधींच्या भीतीमुळे येऊ शकले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केलीय. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीमध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी  विरोधकांवर चौफर फटकेबाजी केलीय.


प्रकृतीचे कारण देणारे पवार आज सर्वत्र मत मागत फिरताय


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्यांनी माझी प्रकृती बरी नसल्याचे कारण देत या सोहळ्याला येण्याचे टाळलं. मात्र, आज सगळीकडे निवडणुकांच्या प्रचारार्थ हेच शरद पवार कसे फिरत आहे? असा सवाल देखील अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला. नुकतेच अमरावती येथे राहुल गांधी येऊन गेले. मात्र त्यांना ऐकणारे कुणीही नव्हतं. त्यामुळे त्यांनीही आधी राम मंदिरात दर्शन घेऊन यावं, जेणेकरून त्यांना कोणी ऐकेल, असा टोलाही अमित शाह यांनी बोलताना लगावलाय. 


सर्व तीर्थक्षेत्रांचा सन्मान मोदींनी केला-अमित शाह


काँग्रेस आणि इतर विरोधकांनी राम मंदिराच्या कार्याला कारण देत अडवून ठेवलंच. मात्र या पवित्र सोहळ्याला आमंत्रण असूनही न येता प्रभू श्रीरामांचा अपमान करण्याचा प्रयत्नही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ राम मंदिरच नव्हे तर देशातील अनेक तीर्थक्षेत्रांचा कायापालट केला. कधीकाळी मुघली आक्रमणामुळे उध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ येथे भव्य कॉरिडोर तयार केला. नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठे नुकसान झालेल्या केदारनाथ आणि बद्रीनाथ ही धाम नव्याने बांधून काढले. त्याचप्रमाणे सोमनाथच मंदिर देखील पूर्ववत तयार होत आहे. त्यामुळे मोदीजींनी आपला मानबिंदू असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांचा सन्मान राखल्याचेही अमित शाह म्हणाले.  


कश्मीरसाठी आम्ही आपले प्रणही देऊ 


दुसरीकडे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की, महाराष्ट्र आणि राजस्थान इथल्या लोकांचा कश्मीरशी काय संबंध. मात्र या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो की, कश्मीरसाठी  महाराष्ट्रातले एकूण एक व्यक्ती आपले प्राण देण्यासाठी देखील तयार आहे. गेल्या 70 वर्षांपासून कश्मीरमध्ये कलम 370 च्या रूपाने एक अन्याय आपण सहन केला. मात्र पंतप्रधानांच्या एका निर्णयामुळे हे कलम देखील संपवण्यातं आले. त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं की, 370 हटवल्याने देशात रक्तरंजित परिणाम होतील. मात्र आमच्या सरकारने हे कलम हटवलं आणि आणि कश्मीरसह देशात शांतता देखील प्रस्थापित केली. हा फरक एका नेतृत्वाचा आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाची पुन्हा एकदा देशाला गरज असल्याचेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 


महत्वाच्या इतर बातम्या