PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल! आज यूएनमध्ये करणार योग दिन साजरा; 'असे' असतील आजचे कार्यक्रम
PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी हे सहाव्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दरम्यान त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा 24 जूनपर्यंत अमेरिका दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान बुधवारी (21 जून) न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये अनेक कार्यक्रम आखण्यात आले आहेत. UN च्या मुख्यालयात 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी नेतृत्व करतील. यासह पंतप्रधान मोदी आज खालील कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींचे 21 जूनचे ठरलेले कार्यक्रम
- अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये पंतप्रधान मोदी पोहोचतील.
- नॅशनल सायन्स फाऊंडेशनमध्ये 'स्किलिंग फॉर फ्युचर इव्हेंट'मध्ये मोदी उपस्थित राहणार आहेत.
- अमेरिकेच्या फर्स्ट लेडी - जिल बिडेन यांची मोदी भेट घेतील आणि 'नॅशनल सायन्स फाऊंडेशन'ला देखील ते भेट देणार आहेत.
- पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमधील एका बिझनेस मीटिंगला उपस्थित राहणार आहेत.
- यूएस फर्स्ट लेडी - जिल बिडेन यांच्यासह स्टेट डिनरसाठी मोदी जातील.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन हे पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करतील.
- व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या खासगी भेटी होतील.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल या मोदींना व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी होस्ट करतील.
मोदींनी दौऱ्याबद्दल नेमकं काय म्हंटलं?
"मी माझ्या दौऱ्याची सुरुवात न्यूयॉर्कपासून करेन, जिथे मी UN मुख्यालयात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी UN नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांमध्ये सहभागी होईल," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर पुढे, भारताच्या डिसेंबर 2014 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता देण्याच्या ठरावाच्या समर्थनार्थ या विशेष कार्यक्रमाबद्दल उत्साहित असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावरून आंतरराष्ट्रीय योग दिन वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या दिवसाच्या ऐतिहासिक कार्यक्रमात 9 वर्षांनंतर प्रथमच ते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग सत्राचे नेतृत्व करणार आहेत.
पंतप्रधान मोदींचा सहावा अमेरिका दौरा
2014 नंतर मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे. पण या दौऱ्याचं महत्व नेहमीपेक्षा अधिक आहे. कारण यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलंय. आपल्या अत्यंत जवळच्या मित्रराष्ट्रांना, खास पाहुण्यांनाच अमेरिकेत स्टेट व्हिजिटसाठी बोलावलं जातं. त्यामुळे हा एक विशेष बहुमान मानला जातो. शिवाय अमेरिकेन संसदेला दोन वेळा संबोधित करणाऱ्या विस्टर्न चर्चिल, नेल्सन मंडेला या मोजक्या नेत्यांच्या यादीतही मोदींचा समावेश होईल.
हेही वाचा: