मुंबई: भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल (Piyush Goyal) यांचे पुत्र ध्रुव गोयल (Dhruv Goyal) यांच्या कांदिवलीतील ठाकुर कॉलेजमधील (Thakur College) एका कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाला आहे. पीयूष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्तीने बसवलं गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. कॉलेज प्रशासनानं विद्यार्थ्यांची आयकार्ड जप्त करून त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप होता. तर याच प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना खरमरित पत्र लिहून जाब विचारला.
ध्रुव गोयल यांच्या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्याला जबरदस्तीने बसवलं जात असल्याचा आणि आयकार्ड जप्त केल्याचा आरोप केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर या व्हिडीओत फेरफार करुन अवास्तव वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ठाकूर कॉलेज प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं. कॉलेजच्या या स्पष्टीकरणावर प्रियंका चतुर्वेदींनी एक खरमरीत पत्र लिहून प्राचार्यांना खडेबोल सुनावले.
काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
ट्विट केलेला व्हिडीओ एका माध्यमाच्या ट्विटर हँडलवरील आधीच होता. त्यावरून प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही. प्राचार्यांमध्ये थोडी जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी त्वरीत आपल्या पदावरुन राजीनामा द्यायला हवा. मतदार जागृती कार्यक्रम राबवताना एकाच विशिष्ट राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या कुटुंबातील व्यक्ती कसा हजर होता? माझ्याकडे माहिती आणि त्यासंबंधी पुरावे देखील आहेत. त्यामुळे आधी तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे असं चतुर्वेदींकडून पत्रात नमूद केलं गेलं आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रात नेमकं काय लिहिलंय?
तुमच्या कॉलेजने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या संदर्भात तुम्ही जारी केलेल्या प्रेस रीलीझमध्ये तुम्ही काही स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार या नात्याने, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि शहरातील रहिवासी या नात्याने समस्या मांडण्याचा, मीडिया रिपोर्ट्सवर आधारित मुद्दे मांडण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करणारी प्रेस नोट जारी करण्याऐवजी तुमच्या विद्यार्थ्यांचा राजकीय प्रचारासाठी वापर करू नका.
सर्वप्रथम, मी शेअर केलेला व्हिडीओ एका न्यूज हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे, जो तुम्ही माझ्यावर केलेल्या आरोपानुसार 'फेरफार' केलेला नाही. व्हिडिओमध्ये फेरफार केल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत, फक्त एवढ्यावरूनच मी तुमच्या संस्थेविरुद्ध मानहानीचा दावा करू शकते.
दुसरे म्हणजे, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि कदाचित प्राचार्यांकडे काही नैतिकता शिल्लक राहिल्यास त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
तिसरे म्हणजे, मतदार जागृती मोहिमेत केवळ विशिष्ट राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्याची उपस्थिती असू शकत नाही.
चौथे, माझ्याकडे पुरेशी माहिती आणि पुरावे असल्याने तुम्ही माझी माफी मागा.
आणि हो शेवटी, उमेदवाराच्या समर्थकांकडूनदेखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तोदेखील पुरावा देखील आहे, ज्यामुळे तुमच्या संस्थेचं आणखी नुकसान झाले आहे.
ही बातमी वाचा: