Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभेच्या जागेवरून महायुतीत भाजप आणि शिवसेनेत ओढाताण पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे अर्धा डझन इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिंगोलीची जागा सोडवून घेण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे (Tanhaji Mutkule) यांनी यासंबंधित मोठे दावे केलेत. हिंगोली जिंकण्यासाठी आम्ही तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत, ही जागा भाजप जिंकून दाखवेल असा विश्वास आमदार मुटकुळे यांनी व्यक्त केला. 


भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले की, मागील तीन महिन्यापासून हिंगोलीच्या शिष्ठमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची चार वेळेस भेट घेतली. भाजपची  ही जागा जिंकण्याची तयारी असून त्यांना त्याचं गणित समजवून सांगितलं. मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री हिंगोलीत आले होते तेव्हा 2000 बूथप्रमुखांना हिंगोलीत एकत्र केले होते. त्या दिशेने आमची पूर्ण तयारी आहे आणि मला खात्री आहे ही जागा आम्हालाच म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळेल. 


अडीच वर्षांपासून तयारी सुरू


आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले की, 2019 मध्ये आताचे खासदार हेमंत पाटील आमच्या युतीत निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले  आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. भाजपचा आणि शिवसेनेचा बेबनाव झाला. त्या काळात आम्ही हेरलं की ही जागा आपण सहज जिंकू शकतो. त्या दिवशी आम्ही सर्व नेते मंडळींनी ठराव केला होता की येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा खासदार झाला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या अडीच वर्षाच्या कालखंडात आम्ही तयारीला लागलो होतो, आज आमची पूर्ण तयारी आहे. एका दिवसामध्ये आम्ही पूर्ण प्रचार यंत्रणा उभी करू शकतो. शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि जिल्हा परिषद प्रमुख असे सर्वजण भाजपच्या या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी उतरलो आहोत.


आपण हिंगोलीची जागा कशी जिंकता येऊ शकते हे केंद्रीय नेतृत्वाला पटवून देऊन, त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले.सन 1985 साली तत्कालीन उमेदवार विलासराव गुंडेवार यांनी भाजपकडून ही जागा लढवली होती. त्यावेळी केवळ 15 हजार मतांनी ते पराभूत झाले होते.तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे ही जागा भाजपने लढली पाहिजे, जिंकण्याची शंभर टक्के आमची क्षमता आहे असंही ते म्हणाले. 


हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास युतीचा धर्म आम्ही पाळणार, भाजपचा कार्यकर्ता कधीही बेईमानी करत नाही, पूर्ण ताकदीनिशी आम्ही युतीचा धर्म पाळणार असल्याचं आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्पष्ट केलं. 


ही बातमी वाचा: