बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा (Beed Lok Sabha Result 2024) मतदारसंघातील पराभवामुळे सध्या जिल्ह्यात तणावग्रस्त वातावरण आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव हा त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या नैराश्यातूनच गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या तीन कट्टर समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी गुरुवारी एक व्हीडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना धीर देण्यासोबतच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे. पंकजा मुंडे यांच्या या आवाहनानंतर तरी आता त्यांचे समर्थक नैराश्य झटकून नव्या उमेदीने उभे राहणार का, हे पाहावे लागेल.
बीडमधील चिंचेवाडी येथे 36 वर्षीय तरुणाने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पोपट वायभासे असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. यापूर्वी ऊसतोड कामगार पांडुरंग रामभाऊ सोनवणे यांनी आत्महत्या केली होती. तर पंकजा मुंडे समर्थक सचिन मुंडे याचाही अपघाती मृत्यू झाला होता. या सगळ्यामुळे सध्या बीड जिल्हा आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
पंकजा मुंडे यांनी नेमका काय संदेश दिला?
नमस्कार काय बोलू, मी तुमच्या सगळ्यांशी हे कळत नाही. मी आवाहन केले, माझं आवाहन तुमच्या दु:खाच्या, नैराश्याच्या पलीकडे ते आवाहन पोहोचत नाही की काय, असं दिसत नाही. गेल्या काही दिवसांत ज्या तरुणांनी आत्महत्या केल्यात, त्यामुळे माझ्याइतकं कोणी खचलं नसेल. मी अहमदपूरमधल्या त्या तरुणाच्या आईशी बोलले, ती माऊली म्हणाली की, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा तुमच्यावर खूप जीव होता. इतकं प्रेम याला मला शब्द सापडत नाहीत. कदाचित तुम्ही माझ्यावर अघोरी प्रेम करताय. प्रत्येकक्षणी एक-एक कर्ज माझ्यावर चढवत आहात.
तुम्ही मला पाहिलंय, गेली 20-22 वर्षात, मुंडे साहेबांसारख्या पहाडासारख्या नेत्याला मी भावनिक होताना पाहिलं आहे, मी त्यांना आधार दिला. मी त्यांना आधार देण्याइतकी मोठी नाही. पण मी आधार द्यायचा भाव आणला, कारण त्यांना वाटायला नको की, आपल्याला मुलगी आहे आणि ती खूप कोमल आहे. नाही बाबा, मी खूप कठीण आहे, कर्मठ आहे, मी तुमच्यासाठी लढायला मागे हटणार नाही. ४ जूनला मुंडेसाहेब गेले तो दिवस आठवा, दगडं पडत होती सगळ्यांच्या डोक्यावर, पण मी धावत जाऊन माईक हातात घेतला, जीवाची पर्वा केली नाही. कोणाचाही विचार केला नाही, विचार केला समाज चेंगरेल, अनेक जीव जातील, याचा केला. तेव्हा मी तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ दिली, ती शपथ तुम्ही पाळली. आता जे काही झालं ते तुमच्या जीवाला लागलं आहे, पण तुम्ही असं जिव्हारी लावून घेणार असाल आणि अशा रस्त्यावर जाणार असाल तर , माझी शक्ती बनण्यापेक्षा असं पाऊल उचलणार असाल तर मला राजकीय पाऊल उचलताना मला प्रश्न पडतो.
माझ्या राजकारणात स्वार्थ नाही, माझं आजपर्यंतचं राजकारण उद्देशाचं होतं, जेव्हा पद मिळालं तेव्हा गरिबांसाठी काम केलं, नाही मिळालं तेव्हा ती गोष्ट हसतखेळत झेलली. हे राजकारण आहे, राजकारणात अशी वेळ येत असते. आतापर्यंतच्या इतिहासात थेटपणे एखाद्या व्यक्तीला, वर्णाला हीन लेखून प्रचार झाला नाही, ते तुमच्या जिव्हारी लागलं आहे, हे मला माहिती आहे. आपल्याला वंचितांचा आवाज बनायचं आहे, आपल्याला त्या सगळ्यांना ताकदी देणारी फौज बनायचं आहे. असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, मग मी कसं काम करु, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुमच्याकडे यायलेय, पण माझा पायच उचलत नाही, सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी येत आहे. कृपा करुन माझी शपथ आहे तुम्हाला, मी साहेबांची शपथ घालून पाहिली, पण स्वत:च्या जीवाला काही करु घेऊ नका.
आणखी वाचा