Beed Loksabha : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी पंकजा मुंडे यांचा जवळपास साडेसहा हजार मतांनी निसटता पराभव केला. त्यानंतर 36 बीडमधील चिंचेवाडी येथे 36 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही दोन तरुणांनी मुंडे यांचा पराभव झाल्याने जीवन संपवले होते. दरम्यान, गावातील लोकांचा आणि नातेवाईकांचे असं म्हणणं आहे की, याबाबतीत कोणतीही चिठ्ठी अथवा ठोस पुरावा नाही. 


पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने आत्तापर्यंत तीन जणांनी जीवन संपवले 


पंकजा मुंडेंचा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला आणि हा पराभव लोकांच्या इतका जिव्हारी लागला की, आतापर्यंत तिघा जणांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर दहा वर्ष प्रीतम मुंडे या खासदार राहिल्या. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. मात्र, 5 वर्ष कोणतेही पद नसताना पंकजा मुंडे संघर्ष करत राहिल्या. त्यानंतर भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा निसटता पराभव केलाय. 


मी पराभव पचवलाय, तुम्हीही पचवा; पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन


कार्यकर्त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर पंकजा मुंडे समोरही आल्या होत्या. त्यांना कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, माझ्या साठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला मुंडे साहेबांची शप्पथ आहे. स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही.  मी लढत आहे संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा. अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


राजकारणामुळं पुण्यातील आणखी एका कुटुंबात गृहकलह, विधानसभेला दीर भावजय आमने सामने?