मुंबई : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) गंभीर आरोप केले आहेत. सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला. माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात दानवेंनी सत्तारांविरोधातील खदखद बोलून दाखवली. सत्तारांनी सिल्लोडमधल्या जमिनी हडपायला घेतल्याचा आरोपही दानवेंनी केला. 


अब्दुल सत्तार हे सिल्लाडचे आमदार असून त्यांच्यात आणि रावसाहेब दानवेंमध्ये लोकसभेच्या निकालानंतर नवा वाद पेटल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवेंचे आरोप महत्त्वाचे आहेत. आपण दानवेंसोबत होतो पण आपल्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा दानवेंना विरोध असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्याचवेळी रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्याशिवाय टोपी काढणार नाही असा पण केला होता, आता दानवेंच्या उपस्थितीत टोपी काढण्याचा कार्यक्रम केला जाईल असं सत्तार म्हणाले होते. त्याला आता रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


काय म्हणाले रावसाहेब दानवे? 


अब्दुल सत्तार कुणाचेच नसल्याचं सांगत रावसाहेब दानवे म्हणाले की, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. प्रसंग पाहून सर्वजण राजकारण करतात. नेत्याने चूक केली आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर ढकलली. अब्दुल सत्तार यांचा इतिहास तपासा. ते कधी कोणासोबत होते? अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ते होते, त्यांना सोडून गेले. एकदा ते अपक्ष होते. त्यानंतर भाजपमध्ये यायचा प्रयत्न केला. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. आता तर म्हणतात की शिंदेंसोबत त्यांचा करार हा प्रासंगिक आहे. सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे. 


सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार


रावसाहेब दानवे म्हणाले की, सिल्लोडची नगरपालिका अब्दुल सत्तारांच्या हाती आहे. सिल्लोडच्या आजूबाजूच्या जमिनी हडपण्याचा प्रकार सुरू आहे. नगरपालिकेच्या जागा ताब्यात घेणे, त्यावर शॉपिंग सेंटर काढणे, नंतर  ते विकणे असे प्रकार सुरू आहेत. त्या गावात जर कुणाला दुकान काढायचं तरी त्याला परवानगी मिळत नाही. सिल्लोडमध्ये तुम्ही कोणतीही जागा घेऊ शकत नाही, जमीन घेऊ शकत नाही याचा अर्थ काय?  त्याच्या विरोधात आम्ही शांत बसायचं का? या देशाच्या हितासाठी जो कोण काम करत असेल तर तो आमचा आहे. पाकिस्तान हा शब्दप्रयोग आहे. कुणीतरी दहशतवाही सत्तारांच्या आमदार निवासात थांबला होता असा आरोप त्यांच्यावर या आधी झाला होता. 


माझा पराभव सत्तारांमुळे नाही तर लोकांमुळे


आपला पराभव हा अब्दुल सत्तारांमुळे नाही तर लोकांमुळे झाल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले. ते म्हणाले की, फक्त सिल्लोडमध्ये नव्हे तर इतर काही मतदारसंघातही मी मागे होतो. माझ्या मुलाच्या मतदारसंघात मला 900 मतं कमी पडली आहेत. त्यामुले अब्दुल सत्तार यांनी माझा पराभव केला नाही, जनतेने माझा पराभव केला. यशाला अनेक बाप असतात, पण अपयश घ्यायला कुणीही समोर येत नाही. मला अपयश आलं ते लोकांमुळे. पण त्याचं श्रेय घ्यायला हे पुढे आले. 


सत्तार टोपी काढणार? 


रावसाहेब दानवे म्हणाले की, रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्याशिवाय मी टोपी काढणार नाही असं सत्तार 2014 साली म्हणाले होते. त्यावेळी मी निवडून आलो. आता लोकांमुळे माझा पराभव झाला. त्याचं श्रेय अब्दुल सत्तार घेत आहेत. लोकांनी पराभव केला हे मी मान्य करतो, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, थांबणार नाही. 


रावसाहेब दानवे आता घरी बसणार का? 


निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता रावसाहेब दानवे घरी बसणार का असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, यश अपयश याचा विचार करत नाही. निवडणुकीत कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार. गेल्या 45 वर्षांच्या राजकारणात मी संरपंचपदापासून ते बँकेचा अध्यक्ष, आमदार, खासदार आणि केंद्रातील मंत्री झालो. माझ्या मतदाराच्या मनात असलं तरी काही वेळा अशी परिस्थिती होते की मतदाराच्या मनात वेगळा विचार येतो. अनेकदा अशी परिस्थिती होते. त्यावेळी चांगले चांगले नेते पराभूत होतात. तसं काहीसं झालं असेल. पद असतानाही पक्षाचं काम केलं आणि ते नसल्यावरही काम करत राहणार. निकालानंतर मी दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरलो आणि आतापर्यंत जवळपास संपूर्ण मतदारसंघ फिरलो. पक्षासाठी आता येत्या काळातही काम करत राहणार.


लोकांच्या प्रतिसादावरून पराभवाचा थोडा अंदाज


पराभव होणार हे माहिती होतं का असा प्रश्न विचारल्यानंतर रावसाहेब दानवे म्हणाले की, निवडणुकीमध्ये आमचा पराभव होतो असं कुणाला काही वाटत नसतं. सात टप्प्यातल्या निवडणुकीत मतदानाची टक्के घसरत गेली. या दरम्यान एक विशिष्ट वर्ग हा आमच्याविरोधात जाणार असं लक्षात आलं. त्याचा फायदा आमच्या विरोधकाला झाला. लोकांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून थोडासा अंदाज आला होता. 


ही बातमी वाचा :