Nagpur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) विदर्भात येऊन गेले आणि तमाम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. नागपूर महानगरपालिकेची (NMC Elections 2022) निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मनसेने शहराच्या 156 वार्डांमध्ये शाखा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शाखाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे. 


यासंदर्भात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आणि पक्षाची बांधणी करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. सद्यःस्थितीत नागपूर महानगरपालिकेमध्ये (nagpur municipal corporation) मनसे कुठेही नाही. त्यामुळे शहरात पक्षाचे नेटवर्क तयार करण्यावर मनसेचे पदाधिकारी भर देणार आहेत. संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याचे राज ठाकरे यांचे आदेश आहेत. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 


सध्या मनसे अर्ध्यावर, लवकरच सर्व शाखा उघडणार


सद्यःस्थितीत जवळपास 70 ते 75 वार्डांमध्ये मनसेच्या शाखा आहेत. आता कुठे आम्ही अर्ध्यावर आहोत, पुढील काळात 156 वार्डांमध्ये शाखाध्यक्ष नियुक्त करून संघटन बळकट करायचे आहे असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आता शहरासाठी दोन अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. अध्यक्षापासून ते शाखाध्यक्षांपर्यंतची बांधणी आगामी काळात करायची आहे असं मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीसंदर्भात बोलताना सांगितले. गेल्या काही वर्षांपासून झोपलेली मनसे आता कुठे जागी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी एक दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे. नागपूरसह पूर्व आणि पश्‍चिम विदर्भातील कार्यकर्त्यांना आता संघटना बांधणीवर जोर दिला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याने मनसेमध्ये उत्साह संचारला आहे. हा उत्साह निवडणुकांपर्यंत कायम राहिल्यास नागपूर महानगरपालिकेमध्ये यावेळी मनसे खाते उघडू शकते. 


देशपांडे, जाधव पुढील आठवड्यात शहरात...


महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटना बांधणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (sandip deshpande) आणि अविनाश जाधव (avinash jadhav) पुढील आठवड्यात नागपूरला येणार आहेत. तेव्हा दोन-तीन आठवड्यांतील कामाचा अहवाल आणि पुढील काळात करायच्या कामांचे नियोजन त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. विभागावर संघटना बांधणीच्या कामाचा आढावा घेण्यात येईल आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Lumpy Skin : आतापर्यंत 72 लाख पशुधनास लसीकरण, विखे पाटलांची माहिती, आता महाविकास आघाडीच सरकार असतं तर....


Shahajibapu Patil : अजितदादांनी आता फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांची भाषणं ऐकावीत, शहाजीबापूंचा टोला