(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti: आमची तिसरी नाही पहिली आघाडी! जरांगेंशी संभाजी राजेंची चर्चा सुरू; राज्यात पुन्हा एक आघाडी होण्यावर राजू शेट्टींनी सांगितलं
Raju Shetti: सध्या राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये राजकारण चालू की टोळी युद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे. जनता या दोघांच्याही कारभाराला वैतागल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
पुणे: राज्यातील चळवळीमधील सर्व पक्षांना एकत्रित करून एक महाआघाडी उभी करायची तयारी सुरू झालेली असून 19 तारखेला याची पहिली बैठक होणार आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. आज पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी आले असता राजू शेट्टींनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये राजकारण चालू की टोळी युद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे. जनता या दोघांच्याही कारभाराला वैतागल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. आमची आघाडी तिसरी नाहीतर पहिली आघाडी असल्याचे सांगताना मनोज जरांगे ही यात सामील होतील असा विश्वास राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुका जवळ येतील तशा प्रकारच्या राजकीय जोडण्या होत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सरकार येऊन गेले. दोन्ही सरकारांचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनतेला बघितलेला आहे. एकमेकांवर गलिच्छ पातळीवर आरोप प्रत्यारोप करणे ,पक्ष फोडणे ,बघून घेण्याची भाषा करणे याच्या व्यतिरिक्त गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये काही झालेला नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला. हे राजकारण आहे की, टोळी युद्ध आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले आहे.
अशा परिस्थितीमध्ये चळवळीचे पार्श्वभूमी असणारे शहरात आणि ग्रामीण भागामध्ये जे छोटे मोठे पक्ष आणि सामाजिक संघटना चळवळी करत असतात, अशा सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून आम्ही महाआघाडी उभारण्याचा प्रयत्न करतोय असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. आमची तिसरी आघाडी नाही तर आमची पहिली आघाडी आहे ते यावेळी म्हणाले. सगळ्या मतदार संघांमध्ये सक्षम आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देवून आम्ही पर्याय देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ज्यांच्याकडे मतदारसंघाचा आणि राज्याचा विकास करण्याचं व्हिजन आहे अशा चेहऱ्यांना आमची सगळी चळवळीची पुण्याई पाठीशी लावून आम्ही निवडणुकीला उभा करणार आहोत. ना आम्ही जातीच्या धर्माच्या किंवा भावनिक मुद्द्याच्या निवडणुका लढवणार नाही तर प्रश्नावर धोरणावर आम्ही निवडणुका लढवणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या महाआघाडीत शेतकरी चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार वामनराव चटप आणि त्यांची शेतकरी संघटना, माजी आमदार शंकरराव धोंडगे व त्यांची महाराष्ट्र विकास समिती, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना,आमदार बच्चु कडू, संभाजी राजे असे सगळे आम्ही एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा चालू असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
त्या संदर्भातली एक बैठक पुण्यामध्ये 19 तारखेला होणार असून मराठा आरक्षणासाठी चळवळ करणारे मनोज जरांगे पाटील हेही आमच्यावर यावे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती युवराज संभाजी राजे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असून एक व्यापक आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली तुम्हाला दिसेल असे शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता या गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाला कंटाळलेले असून त्याचं उत्तर आता निवडणुकीमध्ये जनता देणार याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वास राजू शेट्टी यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.